'डीएसके' यांचा ठाम विश्वास; नव्या उमेदीने पुनरागमनाची तयारी
पुणे : घराला ‘घरपण’ देणारी माणसं म्हणून ओळख असलेले डी. एस. कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मकतेच्या बळावर त्यांनी कठीण काळानंतर नव्याने उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दीपक सखाराम कुलकर्णी या नावाचा 'डीएसके' असा ब्रॅण्ड पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करणारे, एकेकाळी हजारो कुटुंबांची घराची स्वप्नं पूर्ण करणारे 'डीएसके' सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे प्रमुख होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे आणि सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या देणी परत करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या उद्योगसमूहाला मोठा धक्का बसला. या संकटामुळे अनेकांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला होता.
या पार्श्वभूमीवर 'डीएसके' यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. “मला कोणाचाही एक रुपया बुडवायचा नाही,” असे सांगत त्यांनी पुन्हा व्यवसायात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या अडचणी तात्पुरत्या असून भविष्यात परिस्थिती निश्चित सुधारेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, “माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल.” गेल्या चार दशकांत गुंतवणूकदारांना नफा दिल्याचा उल्लेख करत, एकाच वेळी सर्वांनी पैसे मागितल्यास कोणत्याही उद्योगासाठी ते परत देणे कठीण असते, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
दरम्यान, काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक अडचणी वाढवल्याचाही त्यांनी उल्लेख केला, मात्र त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता नसल्याचे स्पष्ट केले. “मी शून्यातून विश्व उभारले आहे, ते सहज संपणार नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या पुनरागमनाची झलक दिली.
सध्या ते नव्या प्रकल्पांवर काम करत असून पुन्हा एकदा हजारो कोटींच्या व्यवसाय उभारणीची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे उद्योगक्षेत्रात आणि गुंतवणूकदारांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
