Breaking News Latest updates loading...

१ कोटी ५८ लाख रुपयांचा साठा जप्त

पानमसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थांविरोधात कारवाई 

पुणे: राज्यातील प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत धडक मोहीम राबवली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार केलेल्या सात दिवसांच्या कारवाईत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई करत ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.

सुमन कल्याणपूर कालवश

 

मुंबई: ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी ३१ मे २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी आपल्या मखमली आणि सुमधुर आवाजाने मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनेक अजरामर गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 
२८ जानेवारी १९३७ रोजी ढाका (सध्या बांगलादेश) येथे झाला. त्यांनी १९५३ मध्ये आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली。 'तुमने पुकारा और हम चले आए', 'ना जाने क्यूँ होता है', आणि 'मुझको अपने गले लगा लो' ही त्यांची अत्यंत लोकप्रिय हिंदी गाणी आहेत.

भारतीय संगीतसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना २०२३ मध्ये केंद्र सरकारकडून 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होत.

लढ्यामुळे सरकार झुकले : मनोज जरांगे पाटील

उपोषण मागे; रुग्णालयात दाखल 

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री उशिरा उपोषण मागे घेताना मराठा समाजाला संबोधित केले. ते म्हणाले की या लढ्यामुळे सरकारला झुकून काम करावे लागले आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आम्हीच सरकारला शोधायला लावल्या, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
दोन दिवस अन्न-पाणी न घेता भर उन्हात उपोषण केल्यामुळे त्यांची तब्येत कमालीची खालावली आहे. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना पुढील ४८ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. 


देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका आता धर्मादाय आयुक्तांकडे

विधी व न्याय विभागाचे राजपत्र प्रसिद्ध 

पुणे: महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मध्ये सप्टेंबर २०२५ पासून केलेल्या सुधारणांनुसार नुकत्याच लागू केलेल्या नविन कलम ‘५०ब’ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ज्या देवस्थानांचे नियमन दिवाणी अथवा जिल्हा न्यायालयाकडे होते ते रद्द करण्याचे राजपत्र २९ मे रोजी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. आता या देवस्थानांचे विश्वस्त मंडळामध्ये धर्मादाय आस्थापनेतील सहाय्यक, उपायुक्त तसेच सह आयुक्तांकडे संबंधित दिवाणी अथवा जिल्हा न्यायाधीशांच्या ऐवजी विश्वस्त म्हणून काम करण्याचे अधिकार हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच या देवस्थान ट्रस्टच्या पुढील विश्वस्तांच्या नियुक्त्यादेखील हेच अधिकारी करतील. शासनाच्या वतीने विधी न्याय विभागामार्फत उप विधी सल्लागार तसेच उपसचिव डॉ. कुंवरसिंह सिंघेल यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे राजपत्र प्रकाशित केले आहे. 

या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे नागपूर येथील अदासाच्या श्री गणपती देवस्थान ट्रस्ट साठी वरिष्ठ सह आयुक्त आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या बाबतीत तेथील धर्मादाय उपायुक्त मनोनीत करण्यात आले आहेत. मांढरदेवी ट्रस्ट साठी तसेच क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान साठी सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कडे नियुक्तीचे अधिकार असतील. 

नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त आठ देवस्थानांपैकी त्र्यंबकेश्वर देवस्थान, काळाराम मंदिर ट्रस्ट, वणी येथील सप्तशृंगी देवी ट्रस्ट, व्यंकटेश बालाजी संस्थान यासाठी नाशिकचे वरिष्ठ सह धर्मादाय आयुक्त यांचेकडे अधिकार देण्यात आले आहेत. अगरटाकळी स्थित रामदास स्वामी मठ आणि मारुती मंदिरासाठी धर्मादाय उपायुक्त तर चांदवड येथील केद्राई माता देवस्थान तसेच सटाण्याच्या संकट मोचन मारुती ट्रस्ट साठी नाशिकचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त नियुक्त झाले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकपैकी रांजणगाव गणपती देवस्थान तसेच आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थान करिता पुण्याचे वरिष्ठ सह धर्मादाय आयुक्त तर कानेरसर येथील यमाई देवी ट्रस्ट साठी धर्मादाय उपायुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

अहिल्यानगरचे धर्मादाय उपायुक्त यांचेकडे मोहटा देवी संस्थानची जबाबदारी असेल तर माहूरच्या रेणुकादेवी संस्थानसाठी नांदेडचे सह धर्मादाय आयुक्त यांना अधिकार दिले आहेत. चंदगडच्या देव रवळनाथ ट्रस्ट साठी कोल्हापूरचे सह धर्मादाय आयुक्त तर देवुळगाव राजा येथील बालाजी महाराज संस्थानसाठी बुलढाणा येथील वरिष्ठ सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा न्यायाधिशांचे अधिकार संपुष्टात 

ही सर्व देवस्थाने पुरातन असून राज्याचा धर्मादाय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांच्या नियमनासाठी तत्कालीन न्यायालयांनी दिवाणी तथा जिल्हा न्यायाधिशांची नियुक्ती केलेल्या योजनेनुसार (scheme) अशा पदसिद्ध नेमणुका असायच्या. विधिमंडळाने दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याने आणि तसा स्वतंत्र अध्यादेश निर्गमित केल्याने एक मे पासून दिवाणी तथा जिल्हा न्यायाधिशांचे अधिकार संपुष्टात आले आहेत,अशी माहिती 
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज प्र. कदम जहागिरदार यांनी सांगितली.

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू

 

बीड : ​मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे, समाजातील आक्रोश इतका वाढला आहे की मराठा बांधवांनी 'समृद्धी महामार्ग' रोखून धरला आहे.

​रस्त्यावर उतरलेला हा जनसागर आणि जरांगे पाटलांचे उपोषण ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी, सरकारने कोणतीही चालढकल न करता मराठा समाजाच्या कायदेशीर आणि न्याय्य मागण्या त्वरित मंजूर करायला हव्यात. समाजाचा संयम आता संपत चालला आहे!


मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून नये यासाठी काल आमदार प्रसाद लाड, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली यावेळी चर्चेदरम्यान..

 अधिकारी ऐकत नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतो, हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीत आमच्याकडून विलंब झाला
, सातारा गॅझेटिअर्सचा जीआर काढला तर कोर्टात चॅलेंज होऊ शकतो म्हणून जीआर काढला नाही, असे मुद्दे मराठा उपसमितीचे उपाध्यक्ष विखे पाटील यांनी मांडले. यावरून निर्णय घेण्यास विखे पाटील असमर्थ असल्याचे दिसले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. आजपासून ते आंतरवाली येथे भर उन्हात उपोषण करणार आहेत.

पुण्यात अवैध दारूविरोधात १००० छापे

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती 

पुणे: अवैध दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की प्राथमिक दृष्ट्या, मृत व्यक्तींना दारूच्या नशेत असल्याचा इतिहास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शवविच्छेदन करण्यात आले असून, अवयवांचे नमुने आरएफएसएलकडे (RFSL) पाठवण्यात आले आहेत. आज रात्रीपर्यंत अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. तपासातील निष्कर्षांच्या आधारे, आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये जो कोणी सामील असेल त्याला शिक्षा होईल, कठोर कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले ''आम्ही यावर्षी २७ मे पर्यंत पुणे शहर हद्दीत अवैध दारूविरोधात १००० छापे टाकले आहेत. आम्ही आमचा शोध आणखी तीव्र करत आहोत. आतापर्यंत एकूण ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. जिथेपर्यंत आरोपींचा संबंध आहे, कदाचित ते सर्वच यात सामील आहेत.''


दरम्यान, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू हा विषारी गावठी दारूमुळे झाल्याचे समजते. गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे. 

दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांड प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

पुणे पोलीस उपायुक्तांनी या मृत्यूकांडाच्या माहितीला दुजोरा दिला. दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११ आहे. यात पिंपरीतील ६ आणि हडपसरच्या ५ जणांचा समावेश आहे. बाकी इतर मृत्यू हे वेगवेगळ्या कारणाने झाले आहेत. यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 तसेच या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला , अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली.


अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवले होते. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे
तर याच विषारी दारूमुळे हडपसर मधील ५ जण दगावले. त्यांच्यापैकी अनेक लोकांना गावठी दारू प्यायल्यावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता.

 

राहुल शरद क्षीरसागर (४५)
विजय भूकुरलाल शर्मा (४५) अरुण डाडर  ( सर्व राहणार हडपसर)
अशोक रमेश चव्हाण ( रा. काळेपडळ)
पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे ( फुगेवाडी)  अशी मृतांची नावे आहेत.

सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटल आणि अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याची ब्राह्मण संघटनांची मागणी

 

पुणे: गुरुवर्य दादोजी कोंडदेव आणि नाटककार राम गणेश गडकरी
यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था / संघटना या सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या सदस्य आहेत. 

यावेळी भालचंद्र कुलकर्णी, विश्वजित देशपांडे, संदीप खर्डेकर, मंदार रेडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकिकर, मनोज तारे,  तृप्ती तारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

काही समाजकंटकांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यांमुळे तसेच सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला आहे. श्रेष्ठ लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी आमची मागणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे,असे निवेदनात म्हटले आहे.

पुणे शहरातील सर्वच समाजातील महापुरुषांच्या जयंती / पुण्यातिथीनिमित्ताने संबंधित पुतळ्यांबाबत पुणे महापालिका सन्मानाने यथोचित कार्यक्रम करीत असते, अशा वेळी वरील नमूद दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची सुयोग्य ठिकाणी पुनर्स्थापना करावी व सन्मान राखला जावा, अशी आमची आग्रहाची मागणी व विनंती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

भालचंद्र कुलकर्णी, ईशानी जोशी,        विश्वजीत देशपांडे    , संदीप खर्डेकर हे सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी असून सूर्यकांत पाठक, मंदार रेडे,  चैतन्य जोशी, सुनिल पारखी, समीर गाडगीळ, विश्वनाथ भालेराव, अतुल व्यास, सौ. पद्मा जोशी, श्रीकांत जोशी, राजेंद्र कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, अमित शहाणे, मनोज तारे, विजय शेकदार, मनोज पांचारिया, अजय दाते, रमेश भागवत, मयुरेश अरगडे, शामराव कुलकर्णी, विश्राम कुलकर्णी, मोहन मुंगळे, ह्रषिकेश सुमंत, सचिन वाडे-पाटील, गिरीश शेवडे, स्मिता इंदापूरकर, उदय लेले,  सुजाता मवाळ, मकरंद माणकीकर, सागर मांडके, कुंदनकुमार साठे सदस्य आहेत.