कोल्हापूर: शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आमदार संजय गायकवाड विरोधात खालील तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुन्हा नोंदवितो, असे सांगितले आहे. गायकवाड एकनाथ शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार आहेत.
प्रशांत श्रीकांत आंबी ( रा. राजेंद्रनगर, नवीन वसाहत, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. फोनवर अश्लील शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, जीभ कापण्याची व घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत संजय गायकवाड या बुलढाणा येथील आमदार विरोधात फौजदारी तक्रार दिली आहे. ॲड. असीम सरोदे हे तक्रारदाराला सहकार्य करत आहेत.
आंबी अनेक वर्षे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक नाममात्र किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित करण्याचे काम करीत आहेत. या पुस्तकाच्या शीर्षकात “शिवाजी कोण होता?” असा एकेरी उल्लेख का अशा कारणावरून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना धमकी दिली आहे.
संजय गायकवाड यांचे प्रत्येक वाक्य कुणालाही राग येईल, मनाचा तोल बिघडेल आणि मानासिक परिणाम होईल असे तणाव निर्माण करणारे होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी, असंस्कृतपणा, स्त्री देहाचा अपमान करणारे घाणेरडे उच्चार इतकेच नाही तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी स्टेटमेंट्स आहेत. संजय गायकवाड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत हे याआधीच्या अनेक घटनांवरून दिसते. त्यांनीच अत्यंत गर्वाने सांगितले की, मी कोण आहे ते गुगल, युट्युब इत्यादी समाज माध्यमांवर बघावे, असे तक्रारीत नमूद करुन आंबी यांनी म्हटले आहे की आमदार असणे म्हणजे आपण काहीही बोलू शकतो, कुणालाही धमक्या देऊ शकतो, कुणाच्याही आई-बहिणींची, बायकोची इज्जत काढू शकतो, कुणालाही मारू शकतो असे त्यांना वाटते.
आंबी यांनी म्हटले आहे की कोणतेही सभ्य संभाषण न करता केवळ शिवीगाळ, असभ्य भाषा असेच संजय गायकवाड करीत होते. तरीही मी त्यांना नम्रपणाने माझे म्हणणे सांगत होतो. दरम्यान मी त्यांना अनेकवेळा तुम्ही पुस्तक वाचा अशी सुद्धा विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार माझ्याकडून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते फक्त शिवीगाळ करीत होते आणि धमक्या देत होते. कोल्हापुरात घरात घुसून तुला मारणार असे त्यांनी अनेकदा म्हटले. ते असंस्कृत, हिंसक लोकांच्या मदतीने माझ्या घरात घुसतील, दंगल घडवून आणतील, सामाजिक तेढ निर्माण करतील अशी साधार भीती मला व माझ्या कुटुंबियांना आहे. त्यांनी व त्यांच्या सोबतच्या गुंडानी आधी सुद्धा अनेकांना जीवावर बेतेल अशी मारहाण केलेली आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड वर गुन्हा नोंदवावा.
वादग्रस्त आमदार संजय गायकवाड विरोधात कोल्हापुरात पोलीस तक्रार
April 23, 2026
Yogesh J