News Portal

नदीकाठ सुधारणा प्रकल्पातील संगमवाडी ते बंडगार्डन काम पूर्णत्वास

 पुणे : महानगरपालिकेमार्फत मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्प प्रगतीपथावर आहे.
प्रकल्पाअंतर्गत नदीकाठालगत थीम पार्क, चालणे व सायकलिंग ट्रॅक तसेच विविध नागरी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पूर्ण झालेल्या १.५० कि.मी. ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त १५ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.


पुणे शहरातून ४४ कि.मी. लांबीने वाहणाऱ्या नदीपैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यान ३.७ कि.मी. नदीकाठ विकासाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

संगमवाडी येथील १.५० कि.मी. लांबीचा नदीकाठ सर्वार्थाने पूर्ण झाला असून  महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (इस्टेट) अतिरिक्त आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी कामाची पाहणी करून वृक्षारोपण केले.
 नागरिकांसाठी हा भाग सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत वापरासाठी उपलब्ध राहणार आहे.

मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यान सुमारे ५ कि.मी. काम पूर्ण करण्याचे नियोजन असून, नजीकच्या कालावधीत लोकप्रतिनिधी व मंत्री यांच्या हस्ते रीतसर लोकार्पण करण्यात येणार आहे.