News Portal

३ पिढ्यांपासून महापालिकेत तळ ठोकणारे भोसले घराणे यंदा हद्दपार

 

 माजी आमदार अनिल भोसले यांना मोठा फटका 

 

पुणे: जुन्या भांबुर्ड्यातून म्हणजे आजच्या शिवाजीनगर परिसरातून ३ पिढ्या पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात सतत असणाऱ्या ऐतिहासिक भोसले कुटुंबियांना मतदारांनी हिसका दाखवला असून प्रथमच घरी बसवले आहे. माजी आमदार अनिल भोसले व त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून वाकडेवाडी भागात होते. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, भाजप अशा सर्व कोलांट्या घेणाऱ्या अनिल भोसले यांना चांगला फटका बसला.


अनिल भोसले आणि त्यांची पत्नी नगरसेविका पत्नी रश्मी भोसले प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर वाकडमध्ये भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे दत्ता बहिरट यांनी त्यांचा पराभव केला. तडीपार असताना अनिल भोसले पत्नीच्या प्रचारासाठी आल्याने उलटसुलट चर्चा झाली होती.


अनिल यांच्यासह १६ जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बँकेत पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांमध्ये सोळा हजार ठेवीदारांमध्ये निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि हातावर पोट असलेल्या कामगारांचा प्रामुख्याने समावेश आहे.


अनिल शिवाजीराव भोसले हे ५० वर्षाचे आहेत. ते पुण्यातील शिवाजी नगरात राहतात. त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालं आहे. त्यांची पत्नी रश्मी भोसले या नगरसेविका होत्या. अनिल भोसले यांचे वडील शिवाजीराव भोसले पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. शिवाजीराव भोसले यांचे वडील विष्णूपंत कुशाबा भोसले हेही तत्कालीन नगरपालिका सदस्य होते. त्यांचा अर्धपुतळा वाकडेवाडी तथा न.ता.वाडी परिसरात आहे.


शिवाजीराव भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. त्यांना विधान परिषदेत संधी मिळाली होती. अनिल भोसले यांना सुद्धा वडिलांप्रमाणे विधान परिषदेत जाण्याची संधी मिळाली. परंतु त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर आमदार असतानाच त्यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली.


२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून मोठा वादही झाला होता. त्यामुळे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून गणल्या जाणाऱ्या अनिल भोसलेंनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करण्यास सुरुवात केली होती. या वादानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सहयोगी सदस्य बनल्या. परंतु, भाजपमध्ये अनिल भोसलेंची डाळ शिजली नाही. काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.