News Portal

१०० वर्षांपूर्वीची पुणे म्युन्सिपाल्टीची मजेशीर वाटणारी निवडणूक

मंडईत बटाट्याच्या गाळ्यात झाले होते मतदान 


( विश्वास खोड)
 

पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंमल अजून ओसरला नसताना १०० वर्षांपूर्वीच्या निवडणुकीचे पत्रक हाती लागले आहे. ते वाचून ऐतिहासिक पुण्यात किती सोज्वळ व्यवहार होते हे समजून मौज वाटेल. १९ जून १९२८ मंगळवार रोजी पुणे म्युनिसिपालिटीची त्रैवार्षिक निवडणूक झाली होती. मतदान चक्क तत्कालीन रे मार्केट म्हणजे आजच्या महात्मा फुले मंडईत बटाट्याच्या गाळ्यांवर झाले.

१०० वर्षांपूर्वी पेठनिहाय मतदान असावे. शुक्रवार पेठेची मतदार संख्या ८२०० होती. पंडित रघुनाथ शास्त्री पटवर्धन हे या निवडणुकीत उमेदवार होते. त्यांचे चिन्ह " श्रीगणपतीचें चित्र" हे होते. मतें देण्याचे ठिकाण - रेमार्केटमधील बटाट्याच्या पटयांत. तारीख व वेळ - १९ जून १९२८ सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ५ होती.

उमेदवाराच्या चिन्हापुढील रकान्यात ५ फुल्या दिल्यास मतदान झाले असे समजले जाई. या रकान्यात सही वगैरे केल्यास मत बाद होते, त्यामुळे फक्त ५ फुल्या लिहा,असे आवाहन पटवर्धन यांनी केले होते.