News Portal

मतदानानंतर हात सुद्धा धुवायचे नाहीत का?

 

पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेला लावलेली बोटावरची शाई साधे हात धुतल्यानंतर  पुसली गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. 


काही जणांनी या संदर्भात व्हिडिओ प्रसारित केले होते. निवडणूक आयोगाने शाई पुसली गेल्याच्या प्रकरणात कुठे चूक झाली?खरे दोषी कोण?याचा सखोल व पारदर्शक तपास केला पाहिजे. 

अमिट शाई (Indelible Ink) म्हणजे अशी शाई जी एकदा लावल्यानंतर सहजपणे पुसता किंवा धुता येत नाही. ती अनेक दिवस,  आठवडे स्पष्टपणे दिसत राहते. अमिट शाईमध्ये प्रामुख्याने सिल्व्हर नायट्रेट (AgNO₃) असते. अमिट शाईचा वापर निवडणुकीत दुहेरी मतदान रोखण्यासाठी, सुरक्षा व ओळखीसाठी महत्त्वाच्या कागदपत्रांवर तसेच औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात कायमस्वरूपी चिन्हांकनासाठी होतो.

हे रसायन त्वचेतील प्रथिनांशी प्रतिक्रिया देऊन आतल्या थरात डाग तयार करते. म्हणूनच ही शाई वरून नाही, त्वचेच्या आतून दिसते. ती साबण, केमिकल, ॲसिटोनने जात नाही. कारण हा डाग वरचा नसतो. तो त्वचेच्या आत तयार होतो आणि असा तयार झालेला रासायनिक डाग सहज निघत नाही. ही शाई ७ १४दिवसांत त्वचा नैसर्गिकरित्या बदलल्यावर हळूहळू फिकी पडते. 


माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या माहितीनुसार जर निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुका दरम्यान वापरलेली अमिट शाई योग्य व खरी असती तर हात धुतल्याने ती कधीच गेली नसती. जर गेली आहे तर शाई निकृष्ट, चुकीची किंवा मुदत संपलेली (एक्सपायर्ड) होती असं समजायला जागा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दोष झाकण्यापेक्षा दोष शोधावा, जबाबदारी ठरवावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.