News Portal

शहर 'फ्लेक्समुक्त' करण्याच्या निर्धाराला हरताळ

 राजकीय आणि खासगी जाहिरात फलक 'जैसे थे '





पुणे: पुणे शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला भाजपच्या नेत्यांनी दिले असले तरी काही ठिकाणी अनधिकृत राजकीय फलक झळकत असून भाजपच्या व अन्य पक्षीय नगरसेवकांचे अभिनंदन करणारे फलक उपनगरांत दिसून येतात. पुणे शहर 'फ्लेक्समुक्त' करण्याच्या निर्धाराला त्यामुळे हरताळ फासला जात आहे.

धायरी, वडगाव, नऱ्हे सारख्या परिसरात अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृत फ्लेक्स दिसून येत असून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातही खासगी, बिल्डर्स, शैक्षणिक क्लासेस व आरोग्य शिबिरे यांची जाहिरात करणारे फ्लेक्स लावणाऱ्यांना कसलाही धरबंध नाही. काही मंडळांनी व संघटनांनी सारसबाग परिसरात आपापल्या हद्दीत कायमस्वरूपी मचाण बांधून ठेवले असून पालिकेचे कर्मचारी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.


केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 'पुणे शहर फ्लेक्समुक्त' करण्याचा शब्द पाळणार असून, पक्षाचा आदेश डावलणाऱ्यांना पदे न देण्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. तथापि महापौर पदासाठी नावे आघाडीवर असणाऱ्यांचेच फ्लेक्स कार्यकर्त्यांनी झळकावले असल्याचे चित्र आहे.

 शहर स्वच्छ आणि देखणे ठेवण्यासाठी सर्व अनधिकृत फ्लेक्स, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत‌‌. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर फ्लेक्स लावणारे नगरसेवक किंवा पदाधिकारी कारवाईस पात्र ठरतील आणि त्यांना पदे न देण्याबाबत पक्षाकडून विचार केला जाणार आहे.

शहराला बॅनर्समुक्त करण्याचे आश्वासन पाळण्यात येईल आणि यापुढे कोणाचेही अभिनंदनाचे फ्लेक्स खपवून घेतले जाणार नाहीत, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले होते.

हे आदेश, विशेषतः पुणे महापालिका निवडणुकीच्या नंतर देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. मात्र अन्य पक्षीय नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी लावलेल्या अनधिकृत फ्लेक्स बाबत कोणते धोरण आहे हे स्पष्ट होत नाही.