पुणे: पुण्यात पहिल्या पुणे ग्रॅंड टूरचा विजेता कोण ठरणार याचे उत्तर देणारा अखेरचा 'पुणे प्राईड' हा ९५ किमी अंतराचा टप्पा आज पार पडत असताना चिंचवड येथे एम्पायर इस्टेट ब्रीज 'पुणे ग्रँड सायकल टूर'चे स्पर्धक अत्यंत वेगाने पुढे रवाना होत होते. त्यावेळी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरुणाईची गर्दी झाली होती.
म्हाळुंगे बालेवाडी येथून सुरुवात होऊन उपनगर आणि बहुतेक पुणे शहरातून जात जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व चौकात शर्यतीची अखेर होणार होती.
युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलतर्फे आयोजित होणारी २.२ मल्टी स्टेज शर्यत भारतात पहिल्यांदाच आयोजित होत आहे. ४३७ किलोमीटर इतके या शर्यतीचे अंतर आहे. या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. शर्यतपटूंना पुण्याची सुखद हवा, वातावरण, संस्कृती अनुभवता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
२.२ टप्प्याची जगातली ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. जागतिक सायकलिंग संघटनेतर्फे आयोजित होणारी एंट्री लेव्हलची शर्यत आहे. शर्यतीत मिळणारे गुण ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातील. पुणे परिसरात होणाऱ्या या शर्यतीत ३५ देशांचे १७१ स्पर्धक आणि २९ संघ शर्यतीत सहभागी झाले आहेत.