पुणे : वाघोली पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे (वय-५४) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १९६(१) (अ), २९९ व ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्या मध्ये अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन लवांडे यांनी येथे फौजदारी अटकपूर्व जामीन अर्ज केला. सदर अर्जावर आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सुनावणी घेतली. ॲड. हर्षवर्धन पवार यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने लवांडे यांना दिनांक २० मे २०२६ पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
अर्जदाराच्या वतीने अॅड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांनी बाजू मांडताना संबंधित प्रकरण हे खोटे व प्रतिशोधाच्या हेतूने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पुढील सुनावणी दिनांक २० मे रोजी ठेवण्यात आली आहे.
यापूर्वी लवांडे यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात स्वतःवर पिस्तूल रोखून धमकावल्याची व अंगावर केमिकल युक्त ऑईलसदृश वंगण टाकण्यात आल्याची तक्रार दिलेली असून त्या प्रकरणात पोलीसांनी किरकोळ व जामीनपात्र स्वरूपाची कलमे लावल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला.
न्यायालयाने आदेशामध्ये संबंधित पोलिसांना नोटीस बजावून “अंतरिम संरक्षण पुढे का सुरू ठेवू नये” याबाबत त्यांचे म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्य अर्जावर सरकार पक्ष व तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे मागविण्यात आले आहे. न्यायालयाने अर्जदारास तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर अंतरिम संरक्षण दिले.
लवांडे यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले असून ते कायदेशीर प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
