News Portal

नगरसेवकांचे राजीनामे आधीच स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या !

चुकीचे काम केले, उन्माद केला तर भाजपच्या नेत्यांच्या  इशाऱ्याची आठवण

 

पुणे: कार्यकर्त्यांच्या परिश्रमांमुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी नीट काम केले नाही, चुकीचे काम केले तर त्यांचा राजीनामा आधीच लिहून घेतला जाणार आहे, अशी घोषणा भाजपच्या नेत्यांनी केली आहे. शहरामध्ये निवडून येणाऱ्या भाजपच्या सगळ्या नगरसेवकांकडून आम्ही स्टॅम्प पेपर लिहून घेणार आहोत की आमच्याबद्दल तक्रार झाली तर आमचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या भावी दिशेविषयी नागरिकांना आश्वस्त  केले होते. 

दुसरीकडे, महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही, महापालिका आपला व्यवसाय नाही, सामाजिक आर्थिक परिवर्तन म्हणून आपण हातात घेतलेला आहे. तशाच प्रकारचा व्यवहार महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे,असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करतानाच पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शक करा, असा सल्ला दिला आहे.

महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. उन्माद कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, दुसरीकडे जबाबदाऱ्याही वाढतात, प्रचंड मोठ्या अपेक्षेने पुणेकरांनी भाजपला बहुमत दिले आहे. जर त्यांच्या पात्रतेला नगरसेवक पात्र ठरले तर पुढची २४ वर्ष त्यांना कोणी हलवू शकणार नाही. नगरसेवक आणि पदाधिकारी जर पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरले नाही तर हा विजय लाटेसारखा निघून जाईल, असे ते म्हणाले आहेत.

आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेले बरे असते. जर लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही याचे भान भाजपच्याच नाही तर अपक्षांसह सर्व पक्षांच्या 
नगरसेवकांनी चांगले लक्षात ठेवले पाहिजे. कोणी कितीही मोठा असला तरी महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा आणि विश्वासापेक्षा मोठे कोणी नाही. अन्यथा जागरुक नागरिक आणि बळकट लोकशाहीसाठी चळवळ चालवणारी 'म्युन्सिपाल्टी न्यूज' सारखी जबाबदार माध्यमे संबंधित चुकारांना जागा दाखवून देण्यासाठी सज्ज आहेत.