News Portal

पुणे ग्रँड सायकल टूर'चे नाव अचानक बदलल्याने नाराजी

 बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' या नव्या नावात 'पुणे' दुय्यम स्थानी


 
 
पुणे : शहरात १९ ते २३ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या बहुचर्चित 'पुणे ग्रँड सायकल टूर'चे नाव असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी सांगितले होते. तथापि आता सर्व ठिकाणी 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' असे नाव प्रचलित होत आहे. पुण्याचे नाव दुय्यम आणि पहिल्या ठिकाणी उद्योग कंपनीचे नाव आल्याने जुन्या पुणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे.

पुणे ग्रँड टूर २०२६ असे या स्पर्धेचे औपचारिक नाव आहे. मात्र त्यात अचानक फेरबदल होऊन 'बजाज पुणे ग्रँड टूर' असा उल्लेख सर्व अधिकारी करताना दिसतात.

पालिकेचे १४५ कोटी रुपये खर्च रस्ते दुरुस्तीवर


या स्पर्धेचा खर्च पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. पुणे महानगरपालिका तर जवळपास १४५ कोटी रुपये खर्च रस्ते दुरुस्तीवर करीत आहे. अशा वेळी पुण्याचे नाव दुय्यम ठिकाणी असणे अत्यंत चुकीचे आहे,अशी प्रतिक्रिया 'आपले पुणे आपला परिसर ' स्वयंसेवी संस्थांचे अध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलतर्फे आयोजित होणारी २.२ मल्टी स्टेज शर्यत भारतात पहिल्यांदाच आयोजित होत आहे. ४३७ किलोमीटर इतके या शर्यतीचे अंतर आहे. या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. शर्यतपटूंना पुण्याची सुखद हवा, वातावरण, संस्कृती अनुभवता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

 २.२ टप्प्याची जगातली ही सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. जागतिक सायकलिंग संघटनेतर्फे आयोजित होणारी एंट्री लेव्हलची शर्यत आहे. शर्यतीत मिळणारे गुण ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातील. पुणे परिसरात होणाऱ्या या शर्यतीत ३५ देशांचे १७१ स्पर्धक आणि २९ संघ शर्यतीत सहभागी झाले आहेत.