Breaking News Latest updates loading...

जणू घरातील कोणी गेले असावे असे सुन्न वातावरण

 दादांच्या अकाली निधनामुळे शोककळा



पुणे: अजित पवारांच्या अकस्मात मृत्यूची बातमी घराघरात प्रचंड धक्कादायक ठरत आहे. आपल्या घरातील कोणी गेले असावे असे सुन्न वातावरण पसरले होते. प्रत्यक्ष संपर्कात आले अनेकांचे डोळे पाणावत होते. अजित दादांचा अलिकडच्या नर्मविनोदी स्वभावाची, वक्तव्यांची आठवण लोकांना येत होती. 

'दादा' म्हणजे मोठा भाऊ हे नाव सार्थ करत त्यांचा विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी असलेल्या चाहत्यांशी, कार्यकर्त्यांशी अजित पवारांचा वैयक्तिक संपर्क असे. अत्युच्च पदावर असूनही ते निगर्वी होते. सर्वांना एकसारखे वागवत. पुण्याच्या सिंहगड रोड वरील धायरीतील कार्यकर्ते रमेश खेडेकर यांच्या घरी भोजनाचे आमंत्रण स्वीकारुन ते १० ऑक्टोबर रोजी दुपारी खास आले होते.

दुग्ध व्यवसायिक रमेश खेडेकर बारामतीकडे रवाना होताना म्हणाले ''१९९४ पासून दादांची माझी ओळख होती. एकदा ओळख झाली की ते नेहमी लक्षात ठेवत. ते माझ्या घरी नुकतेच आले होते. राजकारण विरहित गप्पा झाल्या. दोन तास माझ्या घरी ते होते. माझ्या मुलांच्या शिक्षणाची, कुटुंबाची आणि म्हशींच्या धंद्याची त्यांनी माहिती घेतली. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाची धक्कादायक बातमी ऐकून आमच्या घरातील महिला रडू लागल्या.'