News Portal

आय लव्ह यू दादा!

भाषणा दरम्यान एकाची उत्स्फूर्त आरोळी..त्यावर दादांचा जोक

 

पुणे: अजित पवारांच्या काही निर्णयांबद्दल, सत्ताधाऱ्यांशी असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या छुप्या युतीमुळे अजित पवार आणि शरद पवारही टीकाकारांचे प्रचंड धनी ठरले, पण अजित पवारांचा शेवट सर्वाचाच काळीज कुरतडणारा आहे. आयुष्यभर धावपळ करणाऱ्या अजित पवारांचे किस्से आणि आठवणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता.. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता म्हणून ते प्रसिद्ध होते.

ग्रामीण भागातील काहीसा रांगडेपणा, स्पष्टवक्तेपणा आणि प्रसंगानुरुप विनोदबुद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य त्यातून प्रकट होत आहे. राजकारणाच्या धबडग्यात असूनही ते कायम उत्साही आणि ताजेतवाने दिसत. 

कोणतेही काम असो ते बेस्ट झाले पाहिजे यासाठी आग्रही असणारे ते व्हिजनरी नेता होते. बारामतीचा हा झंझावात महाराष्ट्रभर गेली ३ दशकांहून अधिक काळ सतत चर्चेत राहिला. अखेर बारामतीच्या मातीतच विसावला हे त्याहून अधिक कुरतडणारे आहे. 

'दादा पहाटेच अमक्या ठिकाणी पोहोचले, तमक्या अधिकाऱ्याला झापले काम पुन्हा करायला सांगितले' अशा बातम्या नेहमी प्रसिद्ध होत. दादांना भेटले की काम होतेय हा विश्वास त्यांच्या बाबत पक्का होता. एखाद्या प्रश्नावर दादांकडे उत्तर नाही असे कधी झाले नाही. त्यांची कामाची स्टाईल आणि किस्से त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी आणि मित्र सांगत असतात.

दादा एखाद्या दौऱ्याला गेलेत आणि त्यांना एखादी मजेशीर व्यक्ती भेटली नाही असे होत नसे. 'मला सगळ्यांनी साथ द्या' असं म्हणत असताना कुणीतरी संबळ वाजवावा आणि दादांनी म्हणावं 'तू गप बस तू नको साथ देऊ' आणि सगळ्यांसोबत स्वतःही हसावे.

 भाषण सुरू असताना कुणीतरी खालून 'आय लव्ह यू दादा' म्हणावे आणि दादांनी म्हणावे 'च्यायला! मला बायको म्हणत नाही आय लव्ह यु लव्ह यू ' असे म्हणत हास्य स्फोट करायचे. कार्यक्रमात कुणीतरी चिठ्ठी द्यावी आणि त्यात मोकाट जनावरांचा विषय द्यावा दादांनी त्यावरून विनोद करावा.सगळे लोटपोट व्हावेत. कुठेतरी गाडी थांबवावी मिसळ खावी, चहा घ्यावा, म्हाताऱ्या कोताऱ्यांना भेटावं काम जाणून घ्यावं, थोडीशी मस्ती करावी. दादांच्या अशा किश्श्यांचाच एखादा खंड होईल. 

राजकीय भूमिकांमुळे काही आरोपांमुळे टीकाही झाल्या मात्र त्याला दादांनी फार किंमत दिली नाही. त्यांचे व्हिजन क्लिअर होते, तसे ठामपणे निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी समोरच्यांना देखील वेळोवेळी उघडेही पाडले.