News Portal

खुद्द अजितदादांकडून पुण्याचा घोष; लालफितीला मात्र 'बजाज'चा मोह!

पुणे:  बहुचर्चित 'पुणे ग्रँड सायकल टूर'चे नामाभिधान 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' असे होण्यामागचे गूढ कायम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात  जाणीवपूर्वक 'पुणे ग्रँड सायकल टूर' असाच केला. तरीही सरकारी लालफितीच्या कारभाराला 'बजाज' नावाचा मोह आवरत नाही.

शहरात १९ ते २३ जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या 'पुणे ग्रँड सायकल टूर' मुळे अनेक तास रस्ते अडवून धरले गेले. त्यामुळे पुणेकरांत संमिश्र प्रतिक्रिया आहेत.


दरम्यान, या स्पर्धेचा खर्च पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. पुणे महानगरपालिका तर जवळपास १४५ कोटी रुपये खर्च रस्ते दुरुस्तीवर करीत आहे. अशा वेळी पुण्याचे नाव दुय्यम ठिकाणी असणे अत्यंत चुकीचे आहे,अशी प्रतिक्रिया 'आपले पुणे आपला परिसर ' स्वयंसेवी संस्थांचे अध्यक्ष, माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी व्यक्त केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कदाचित ही बाब लक्षात घेऊन 'पुणे ग्रँड सायकल टूर' असाच उल्लेख आपल्या भाषणात केला. तथापि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या वार्तापत्रात 'बजाज पुणे ग्रँड सायकल टूर' असा उल्लेख आहे.

दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर 'बजाज' नावाचा इतका मोह कशासाठी असा प्रश्न पुणेकरांपैकी जाणकारांनी उपस्थित केला असून यामागे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाविषयीच्या आकांक्षेमुळे काही सूप्त हालचाल आहे किंवा काय अशी शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलतर्फे आयोजित होणारी २.२ मल्टी स्टेज शर्यत भारतात पहिल्यांदाच आयोजित होत आहे. ४३७ किलोमीटर इतके या शर्यतीचे अंतर आहे. या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. शर्यतपटूंना पुण्याची सुखद हवा, वातावरण, संस्कृती अनुभवता यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे