अजित पवार यांच्या शहराच्या भरीव विकासात योगदानाची आठवण
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पिंपरी - चिंचवड शहरातील व्यावसायिकांनी दुकाने दुपारनंतर बंद ठेवली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही शासकीय सुटी जाहीर केली. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालकेतही शुकशुकाट होता.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात अजित पवार यांचे भरीव योगदान होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांची जवळपास १५ वर्षे एकहाती सत्ता होती. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केवळ पिंपरी-चिंचवड नव्हे तर पुण्याच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान होते.
दुकाने बंद झाल्यावर शहरात दुपारनंतर ठिकठिकाणी व्यावसायिक एकत्र जमून अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांबाबत चर्चा करीत होते. शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
पुणे - मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी त्यांना अनेकजणांनी विरोध केला होता. परंतु त्यांनी नेटाने पुणे - मुंबई महामार्गाचे रुंदीकरण तर केलेच पण समतल विलगकही केलेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विरोधकांनीही त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले होते. शहरातील अनेक चांगले रस्ते, उड्डाणपूल त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले.
