News Portal

पुणे महानगरपालिका ; कोणतीही करवाढ नाही प्रशासनाचा ५ टक्के करवाढीचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने फेटाळला

पुणे : महानगरपालिका प्रशासनाकडून मिळकतकरात प्रस्तावित करण्यात आलेली ५ टक्के करवाढ आजच्या सर्वसाधारण सभेत ठामपणे फेटाळण्यात आली. सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या हिताला प्राधान्य देत मिळकतकर धारकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकू नये, अशी स्पष्ट व ठोस भूमिका सभागृहात मांडली. परिणामी पुणेकरांवरील संभाव्य करवाढीचे संकट टळले. 

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी माध्यमांना सांगितले की, “पुणेकरांनी भाजपला मोठ्या विश्वासाने साथ दिली आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रशासनाने सुचविलेला करवाढीचा प्रस्ताव आम्ही फेटाळला असून १ टक्काही करवाढ होऊ दिलेली नाही. त्यामुळे सध्या कोणतीही करवाढ लागू होणार नाही.”

शहरातील विकासकामांना गती देताना नागरिकांवर कर वाढविण्याऐवजी महापालिकेच्या उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत मजबूत करण्यावर भर दिला जाईल, समाविष्ट गावांच्या करवाढीचा मुद्दा विशेष सभेद्वारे मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही  बिडकर यांनी दिली आहे.