News Portal

पत्रकारितेचे फालतुकरण झाले आहे

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांची टीका 



पिंपरी : आजघडीला पत्रकारिता नीचांकाला पोहोचली आहे. कोण आमदार मंगलाष्टका म्हटला याच्या बातम्या केल्या जातात. एवढे फालतुकरण पत्रकारितेचे झाले आहे, अशी टीका ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई देसाई यांनी व्यक्त केली.

अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आयोजित "पीसीएमसी टॉप १० पुरस्कार २०२६" वितरण सोहळा गुरुवारी खराळवाडी, पिंपरी येथे पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा जणांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले '' एक प्रवक्ते सकाळी बोलतात आणि सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता त्याला उत्तर देतो. आपण कोणाबद्दल बोलतो, आपले वय, भान याचा विचार केला जात नाही. आजमितीला पत्रकारांना निर्भीडपणे लिहिता येत नाही. लिहिले तर छापले जात नाही. छापण्याचा आग्रह केला तर नोकरी जाण्याची भीती आहे. भारतातील मीडिया कॉर्पोरेट झाला आहे. उद्योजकांचे न्यूज चॅनेल असून त्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी बातम्या दिल्या जातात. अनेक चॅनेल सरकारची भलावण करतात. मीडियावर सरकारचे प्रभुत्व आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे मंत्रीपदांवरील व्यक्ती भाष्य करतात. दुर्देवाने मिडियातून त्याला प्रसिद्धी दिली जाते. आक्षेपार्ह गोष्टी दाखवू नये यावर आता जनतेने आवाज उठवला पाहिजे. जनतेशी निगडित प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी धार्मिक मुद्दे समोर आणले जातात.''

पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन देसाई म्हणाले की पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर समाज संपेल.

पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू : चिलेकर

पत्रकारांची मुस्कटदाबी सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटून चार वर्षे झाली, पण निकाल लागत नाही. न्यायपालिकेची ही अवस्था आहे. संसदीय लोकशाहीचीही वाईट परिस्थिती आहे. महापालिका प्रशासन अतिशय भ्रष्ट आहे. मागील चार वर्षांत महापालिका तिजोरी खाली केली आहे. पत्रकारांनी याचा जाब विचारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. पत्रकारिता जगवायची की मारायची याचा जनतेने विचार केला पाहिजे , असे पुरस्कारार्थींच्या वतीने बोलताना ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर म्हणाले.