News Portal

'पीटीपी अ‍ॅप' बंद करण्यासाठी पोलिसांवर दबाव?

पुणे: बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नागरिकांनाही अधिकार देणाऱ्या पीटीपी अ‍ॅपची (पुणे ट्रॅफिक पोलिस अ‍ॅप) शिस्तप्रिय नागरिकांमध्ये लोकप्रियता वाढत असताना हे अ‍ॅप बंद करावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. 

वाहनांची प्रचंड संख्या असलेल्या पुण्यात वाहतूक पोलिसांना मर्यादा आहेत. या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांनी पोलिसांना केलेल्या मदतीमुळे ३ कोटी रुपयांचा दंड बेशिस्तांना भरावा लागला. त्यामुळे बेशिस्तांची कुरकुर राजकीय बेदरकार मनावर घेऊ लागले असावेत असे दिसते. हेल्मेट बंदी झुगारून देण्यासाठी काही राजकीय मंडळींनी नको ते आंदोलन केले होते. तसाच प्रकार पीटीपी अ‍ॅप बाबत होईल की काय अशी शंका आहे.

पीटीपी अ‍ॅप पुणे शहर ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक उल्लंघनांची तक्रार करण्यासाठी सक्षम करण्यासाठी सुरू केलेले एक अधिकृत मोबाइल अ‍ॅप आहे. रस्ता सुरक्षा आणि वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी डिजिटल पोलिसिंग उपक्रमाचा भाग म्हणून जून २०२५ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले. नागरिक अ‍ॅपद्वारे थेट वाहतूक नियम उल्लंघनाचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात.

सिग्नल जंप करण्यापासून बेदरकारपणे फुटपाथवर दुचाकी वाहने उभी करणे, मोबाइलवर बोलत टु व्हीलर चालवणे, ट्रीपल सिट जाणे, अतिशय वेगाने वाहन चालवणे, फुटपाथवर वाहन चालवणे अशा अनेक प्रकारे बेशिस्त वाहनचालक इतरांना त्रास देत असतात.