पुणे: महाराष्ट्रातील एक थोर स्वातंत्र्यसैनिक, प्रभावी वक्ते, लेखक आणि केंद्रीय मंत्री
नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ यांच्या अर्धपुतळ्याची दीर्घकाळ उपेक्षा सुरू असून सारस बागेजवळील त्यांच्या पुतळ्याची दुर्दशा झाली आहे.
१९७७ च्या सुमारास या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्या पुढाकाराने झाली होती. अभिनव महाविद्यालयाच्या समोरच्या पुरम चौकात दक्षिण बाजूस एका कोपऱ्यात हा अर्धपुतळा असून देखभालीअभावी दुर्दशा झाली आहे. गाडगीळ यांचे नातू, माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी याविषयी खंत व्यक्त केली.
काकासाहेब गाडगीळ (१० जानेवारी १८९६ – १२ जानेवारी १९६६) १९२० पासून काँग्रेस पक्षात सक्रीय होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आठ वेळा कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
१९३४ मध्ये ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले. ते भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांनी कामगार, खाणकाम आणि ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली.
त्यांनी फाळणीनंतर पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी तसेच दिल्लीच्या विकासासाठी मोठे कार्य केले.
ते पंजाबचे राज्यपाल म्हणूनही प्रसिद्ध होते.
काकासाहेब गाडगीळ यांच्या अर्धपुतळ्याची दीर्घकाळ उपेक्षा
Yogesh J
March 21, 2026
