उद्योजक राम भोगले यांचे वक्तव्य
पुणे : "अर्थनीती म्हणजे निव्वळ पैशांचं व्यवस्थापन नाही.तर ते देशाचे सर्वांगीण धोरण असते. म्हणूनच शिक्षण,संरक्षण,उद्योग,व्यापार व कृषी अशा सर्वच गोष्टींचा त्यात समावेश असतो.गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आणि अर्थनीतीला नवे आयाम जोडले. त्यामुळेच भारताची अर्थनीती ‘थोडी आगळी , पण जगावेगळी’ ठरली"असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योजक राम भोगले यांनी रविवारी येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहकारनगर येथील अरण्येश्वर प्रभात शाखा आणि विद्या विकास विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'शिक्षण महर्षी लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृति व्याख्यानमाले'त ते बोलत होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पद्मावतीनगर संघचालक अविनाश धोमकर आणि विद्या विकास प्रशालेचे अध्यक्ष विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यावेळी व्यासपीठावर होते.
‘भारताची अर्थनीती-थोडी आगळी,जगावेगळी’ या विषयाच्या अनुषंगाने राम भोगले यांनी गेल्या दहा वर्षात भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदललेल्या अर्थनीतीमुळेच भारताला ही झेप घेता आली असे ते म्हणाले.
मोदी राजवटीपूर्वी आणि विशेषतः स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्यावर सरकारचा भर होता.यामुळे मागणी वाढली,पण देशांतर्गत उत्पादन कमी असल्याने त्याचा फायदा चीन,अमेरिका या देशांनी घेतला.पंतप्रधान मोदीनी मात्र उत्पादनवाढीवर भर दिला. ‘उत्पादन वाढवा व आपल्या वस्तू परदेशात विका’ हे त्यांचे सूत्र आहे. त्यांनी अनेक उद्योग खासगी क्षेत्रांसाठी खुले केले. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनेही भारत फोर्ज सारख्या कारखान्यात व्हायला लागली.मोबाईलच्या क्षेत्रात भारत जगात अग्रेसर ठरला.
सरकारच्या गोदामात साठलेले धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेला मोफत दिले पण त्याचवेळी शेतक-यांचे धान्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करून शेतीविकासालाही वाव दिला. कर्ज धोरणात सुधारणा करुन बॅंका बळकट केल्या आणि 'मेक इन इंडिया' सारख्या योजना राबवून उद्योगांसाठी नवी क्षितीजे खुली केली.
या नव्या अर्थनीतीमुळे करोनाच्या संकटानंतर जगातल्या अनेक राष्ट्रांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असतांना भारतीय अर्थव्यवस्था मात्र प्रगतीकडे झेप घेत आहे" असे राम भोगले म्हणाले.
प्रारंभी डॉ शरद कुंटे यांनी प्रस्ताविकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्षातील भूमिका मांडली.सुधीर मोघे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. भूषण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी यजुर्वेद कंठस्थ घनपारायण पूर्ण केल्याबद्दल सहकारनगरमधील वेदमूर्ती ऋतूश मंगेश याळगी यांचा उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे आर्थिक विषयाला अनुसरुन सुरुवातीला श्रीसुक्ताचे गायन करण्यात आले.मीनल गानू यांनी श्रीसुक्ताचे गायन केले तर सोनाली निबंधे यांनी श्लोकांच्या अर्थाचे वाचन केले.गौरी कुलकर्णी यांनी आभार मानले. असिमा मुजुमदार यांच्या संपूर्ण वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
