News Portal

अखेर युद्धविरामाची घोषणा;जगाने सुटकेचा निश्वास सोडला




वाॅशिंग्टन :  अमेरिका आणि इराणमध्ये अखेर दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असून पाकिस्तानच्या मध्यस्तीनुसार  दोन्ही बाजूंनी परस्परांवर होणारे हल्ले थांबणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन संपायला एक तास शिल्लक असताना ही घोषणा करण्यात आली. 
 

 मागील अनेक दिवसांपासून जगाचे लक्ष ज्या निर्णयाकडे लागले होते, ती घोषणा अखेर आज झाली. यामुळे सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मध्य पूर्वेमध्ये आता पुन्हा एकदा शांतता निर्माण होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

इराण सीजफायरसाठी तयार झाला असून इराण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पूर्णपणे जलवाहतुकीसाठी खुला करणार आहे. इराणने या जलमार्गावरील वाहतूक नियंत्रित केली होती. 

 अमेरिकेसोबत चर्चेला तयार असल्याचे इराणने म्हटले असून शुक्रवारपासून पाकिस्तानातील  इस्लामाबादमध्ये
१० एप्रिलपासून ही चर्चा सुरु होईल. युद्धविराम कायम रहावा हाच या बैठकीचा उद्देश असेल. या सीजफायर डीलमध्ये पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली असे वरवर दिसत असले तरी चीन जर यामध्ये पडला नसता तर हा करार होऊ शकला नसता.

 चीनच्या हस्तक्षेपानंतर इराणने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला. चीन इराणचा महत्वाचा सहकारी आहे. युद्धकाळात चीनकडून इराणला मदत पोहोचवण्यात आली. इराणने आपली भूमिका लवचिक करावी यासाठी चीनने त्यांची समजूत काढली.

दरम्यान, इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने युद्धात दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य केल्याचे जाहीर केले. ही चर्चा म्हणजे युद्ध समाप्ती नाही असे सुद्धा सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.

 इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून एक दहा कलमी प्रस्ताव अमेरिकेला पाठवला आहे. यानंतर आता इस्रायलने भूमिका स्पष्ट केली आहे.

अहिंसेची वचनबद्धता, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम ठेवणे, युरेनियम संवर्धनाला मान्यता, सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे, सर्व दुय्यम निर्बंध हटवणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणे, नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे, इराणला नुकसान भरपाई देणे, या प्रदेशातून अमेरिकी सैन्य मागे घेणे, लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धच्या लढाईसह सर्व आघाड्यांवर युद्धविराम, अशा १० मुद्द्यांचा या प्रस्तावात समावेश आहे. परंतु, यातील काही मुद्द्यांना इस्रायलचा आक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण या दोन देशांत दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार झाला असला तरी, इस्रायलची लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध जी लढाई सुरू आहे, त्यासाठी हा करार लागू नसेल. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे. इराणने तत्काळ होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी. अमेरिका, इस्रायल तसेच या प्रदेशातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत, अशी मागणी इस्रायलने केली आहे.

अमेरिका, इस्रायल, आखाती देशांसह जगाला यापुढे आण्विक, क्षेपणास्त्र आणि दहशतवादी धोका निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.