News Portal

अपराधांना बळी पडलेल्या महिलांची ओळख उघड केल्यास दोन वर्षाचा कारावास

नाशिक प्रकरणातील 'एसआयटी'चा इशारा 

नाशिक : भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (१) नुसार नमूद अपराधांना बळी पडलेल्या महिलांची कोणतीही ओळख उघड करता येत नाही, कोणत्याही बाबतीत पीडित महिलेची ओळख उघड झाल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (१) अन्वये गुन्हा नोंद होवून त्यात दोन वर्षाचा कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा नमूद केलेली आहे, असा इशारा नाशिक येथील प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या ( एसआयटी) प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी दिला आहे.


आरोपी अशोक खरात विरुध्द सरकारवाडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७३/२०२६ बी.एन.एस. कलम ६४ (१), ७४, ३५१(२) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम कलम ३(१) (२) अन्वये दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक करत आहे.

सर्व न्युज चॅनल्स, न्युज चॅनल्सचे इन्स्टाग्राम हॅन्डल्स, यु ट्यूब न्युज पोर्टल्स, ऑनलाईन न्युज पोर्टल्स, इन्स्टाग्राम न्युज पोर्टल्स व इतर सोशल मिडीया आधारीत बातमीपत्र धारक यांना विशेष तपास पथकाने सुचना जारी केली आहे. काही बातम्यांमध्ये पीडित महिलेची ओळख उघड होईल असे वक्तव्य, फोटो, व्हीडीओ, पिडीत महिलेचा पत्ता, पिडीत महिलेचे नातेवाईकांची नावे, पिडीत महिलेचे गावाचे नाव, फिर्यादीतील संपूर्ण घटनाक्रम ज्यावरून पीडीत महिलेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिडीत महिला आणि तिचे कुटूंबीय हे प्रचंड मानसिक तणावात आहेत, असे 'एस आयटी'ने स्पष्ट केले आहे.

सदर गुन्ह्याबाबत बातमी, वृत्तांकन, करताना पिडीत महिलेची ओळख उघड होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. जर आपल्या बातमी मुळे पिडीत महिलेची ओळख उघड झाल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (१) नुसार आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सातपुते यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.