Breaking News Latest updates loading...

अंजली चंद्रकांत पाटील यांचा 'गीताव्रती' पदवीने गौरव

 


पुणे: सौ. अंजली पाटील यांना 'गीता परिवार' या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित 'गीताव्रती' ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. श्रीमद्भगवद्गीतेचे शुद्ध उच्चारण, पाठांतर आणि सखोल अर्थाचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात येते.

सौ. अंजली पाटील या स्वतः एक कॉस्ट ऑडिटर असूनही, त्यांनी व्यस्त कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत गीतेचा सखोल अभ्यास केला. 'गीता परिवार' या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्गांच्या माध्यमातून त्यांनी गीतेचे १८ अध्याय पूर्ण केले. केवळ पाठांतर नव्हे, तर गीतेतील कर्मयोग आपल्या आचरणात आणण्यासाठी त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गीता परिवार’ ही संस्था जगभरात गीतेचा प्रचार करत आहे. या संस्थेचा 'गीताव्रती' हा एक सन्माननीय टप्पा असून, जो साधक गीतेच्या शुद्ध पठणात नैपुण्य मिळवतो, त्याला ही पदवी दिली जाते.