पुणे: महापालिका आणि पुणे पोलिसांच्या वतीने 'होर्डिंगमुक्त पुणे' मोहीम राबवली जात आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध कारवाई करण्यासाठी तयार केलेल्या ‘पीटीपी ॲप’वर नागरिकांनी बेकायदा फलकांची माहिती कळवावी’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी २३ मार्च रोजी केले, मात्र त्यानंतर ३ आठवडे उलटूनही ‘पीटीपी ॲप’ मध्ये तशी सुविधा निर्माण करण्यात आलेली नाही. बेकायदेशीर फलकांबाबत जागरुक असलेले पुणेकर ‘पीटीपी ॲप’ मधील बदलांच्या प्रतीक्षेत आहेत.
अमितेशकुमार यांनी बेकायदा फलक लावणाऱ्यां विरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहर अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्ज विरोधात पाऊले उचलली आहेत. त्यालाच जोड देत पुणे पोलिसांनी ‘पीटीपी ॲप’ व्दारे तक्रारी नोंदवण्याचे अधिकार पुणेकरांना दिल्याने जाहिरात प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. तथापि अमितेशकुमार यांच्या घोषणेनंतर PTP - Pune Traffic Police ॲप मध्ये यादृष्टीने काही बदल झालेले नाहीत अशा तक्रारी आहेत. या दिरंगाईचे कारण समजू शकले नाही. ॲपचा मुख्य उद्देश शहर विद्रुप करणाऱ्या बेकायदा फलकांवर अंकुश ठेवणे आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे फलक हटवणे हा आहे.
पुण्यातील बेकायदेशीर फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर कारवाई करण्यासाठी पुणे पोमोहिमेअंतर्गत नागरिक थेट बेकायदेशीर फलकांचे फोटो आणि माहिती या ॲपद्वारे पोलिसांना पाठवू शकतात. नागरिक आपल्या परिसरातील बेकायदेशीर फ्लेक्सचे फोटो काढून ॲपवर अपलोड करू शकतात. तक्रार करताना फलक लावलेल्या ठिकाणाची माहिती ॲपमध्ये नोंदवता येते. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गुप्त ठेवली जाते.
ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पोलीस त्याची पडताळणी करून संबंधित बेकायदेशीर फ्लेक्स लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतील. नियमबाह्य फ्लेक्स लावल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आणि दंड आकारण्याची कारवाई होईल.
होर्डिंगमुक्त पुण्याची पोलीस आयुक्तांची रणगर्जना; ‘पीटीपी ॲप’ मात्र निष्क्रियच!
April 19, 2026
Yogesh J
