चारचाकीत बेशुद्धावस्थेत असलेल्या प्रौढाला रुग्णालयात केले दाखल
पुणे : बाणेर येथील एका हॉटेलसमोरील चौकात चारचाकी चालवत असताना हृदयविकार आलेल्या मोहम्मद चांदभाषा नदाफ (वय ५२, रा. सय्यदनगर, हडपसर) यांना वाहतूक पोलीस अंमलदार अनिल माने यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केले. हृदयविकारानंतरच्या तासभराला 'गोल्डन अवर्स ' म्हटले जाते. त्या दरम्यान नदाफ यांचे प्राण वाचले. हरवलेल्या माणुसकीचे हृद्य उदाहरण यामुळे पुढे आले.
सोमवारी दुपारी नदाफ आपल्या चारचाकीतून जात होते. हॉटेल महाबळेश्वरसमोरील चौकात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. अत्यवस्थ होत त्यांनी वाहन रस्त्यातच थांबविले आणि ते बेशुद्ध झाले. मागून येणाऱ्या वाहनांची अडचण होत असल्याने कोणी तरी बंद असलेल्या वाहनात डोकावून पाहिले तेव्हा नदाफ बेशुद्धावस्थेत आढळून आले. काही लोकांना वेगळा संशय येऊन ते संतप्त झाले. वाहन बाजूला घेतले जात नसल्याची माहिती मिळताच बाणेर वाहतूक विभागाचे कर्मचारी पोलिस अंमलदार अनिल माने, शरद राऊत, ट्रॅफिक वॉर्डन श्रीकृष्ण माळी जेवण तसेच सोडून घटनास्थळी आले.
चालक दार उघडत नसल्याचे लक्षात येताच माने व सहकाऱ्यांनी आणि नागरिकांनी वाहनाची काच फोडून नदाफ यांना बाहेर काढले. नदाफ यांना हृदयविकाराची लक्षणे जाणवल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने 'सीपीआर' म्हणजे हृदयावर दाब दिला आणि बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात तातडीने दाखल केले. पैसे नंतर भरण्याविषयी रुग्णालय कर्मचाऱ्यांची समजून माने यांनी काढली. वेळेत उपचार मिळाल्याने नदाफ यांचा जीव वाचला.
नदाफ यांच्या मोबाईल वरुन संपर्क साधत कुटुंबियांना बोलावून घेण्यात आले. नदाफ यांची प्रकृती स्थिर आहे. वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल नदाफ कुटुंबियांनी अनिल माने यांचे आभार मानत ऋण व्यक्त केले.
वर्दीतील माणुसकीमुळे वाचले हृदयरोग्याचे भर रस्त्यात प्राण
May 15, 2026
Yogesh J