Breaking News Latest updates loading...

पुणे जिल्हा न्यायालय परिसरातील धक्कादायक प्रकार

न्यायप्रक्रियेत हस्तक्षेपाचा आरोप

पुणे : पुणे जिल्हा न्यायालय परिसरात अत्यंत धक्कादायक व न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली असल्याचा आरोप करण्यात आला. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे प्रवक्ते विकास लवांडे व त्यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात शपथपत्र दाखल करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, वाघोली पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल करून कथित खोटे व प्रलंबित गुन्हे दाखवत विकास लवांडे यांना यापूर्वी मिळालेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करून घेतला आहे.

सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्हा न्यायाधीशांनी अर्जावर सरकारी पक्षाचे म्हणणे मागवून घेतले व या अर्जाची तातडीची सुनावणी दुपारच्या सत्रात ३ वाजता ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारी अंदाजे १.३० वाजण्याच्या सुमारास विकास लवांडे हे स्वतः व त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार, ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. सारंग बाहिरट, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड. ऐश्वर्या पोकळे, ॲड. ओमकार चव्हाण व श्रीराज पवार यांच्यासह शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ मधून बाहेर पडत असताना अचानक वाघोली पोलिस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक अमोल काळे हे त्यांच्या खासगी वाहनातून तेथे आले.

त्यांनी विकास लवांडे यांना “गाडीत बसा आणि पोलिस स्टेशनला चला” असे सांगितले. त्यावर विकास लवांडे यांनी “मला नोटीस दिली आहे का? तुमच्याकडे अटकेचे वॉरंट आहे का?” असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपनिरीक्षक अमोल काळे यांनी “तू पोलिस स्टेशनला चल, तुला तिथे सर्व दाखवतो” असे उत्तर दिल्याचे सांगण्यात आले.

यावेळी ॲड. मिलिंद पवार यांनी उपनिरीक्षक काळे यांना स्पष्ट सांगितले की, आज दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनाच्या अर्जाची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. आपण विकास लवांडे यांना न्यायाधीशांसमोर घेऊन जाऊ. न्यायालय जो आदेश देईल त्याचे सर्वजण पालन करू.”

मात्र त्यावर उपनिरीक्षक अमोल काळे यांनी “ते आम्हाला सर्व माहिती आहे, मी त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन जाणार,” अशी अरेरावीची भाषा वापरून विकास लवांडे यांना जबरदस्तीने वाहनात बसवले, असा आरोप करण्यात आला आहे.

गाडीत बसल्यानंतरही विकास लवांडे, ॲड. मिलिंद पवार व इतर वकील वारंवार सांगत होते की, “आपला काही वैयक्तिक वाद नाही. हे सर्व राजकारणातून सुरू आहे. हे कायद्याचे राज्य आहे. आपण सार्वजनिकरित्या मा. न्यायाधीशांसमोर जाऊ.” तरीसुद्धा “फक्त चौकशीसाठी घेऊन जातो, नंतर सोडून देतो” असे सांगत उपनिरीक्षक अमोल काळे व त्यांच्या सोबत असलेल्या साध्या वेशातील अनोळखी व्यक्तींनी विकास लवांडे यांना शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातून सर्व वकिलांसमोर घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ही घटना न्यायालय परिसरात घडल्याने वकिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून न्यायप्रक्रियेत पोलिस हस्तक्षेप, न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान आणि आरोपीच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

सदर घटनेचे छायाचित्र व व्हिडीओ पुरावे उपलब्ध असून ते संपूर्ण सत्य परिस्थिती दर्शवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, २२ मे  रोजी या संपूर्ण प्रकाराबाबत ॲड. मिलिंद पवार हे पुणे जिल्हा न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून न्यायालयीन दाद मागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.