सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची खंत
पुणे: ज्ञानेश्वर उगले नावाच्या तरुणाने डिसेंबर २०२४ मध्ये आत्महत्या केली. पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावण्याचा निमित्ताने मंगेश खामकर याने त्याला आठ लाख रुपयांना फसवले. तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे मागील आठवड्यात पोलीस तपासासाठी पुणे महापालिकेत येऊन गेले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुढे आणली आहे.
कुंभार यांनी म्हटले आहे की मी मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नोकरी लावण्याच्या नावाखाली फसवणूक झालेल्या तरुणांचा विषय उचलला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि दोन्ही महापालिकांच्या आयुक्त यांच्याकडे गुन्हेगारांच्या नावानिशी तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप तरी काही ठोस पावले कोणी उचलल्याचे ऐकिवात नाही. कागदी घोडे नाचवण्यावरच सगळ्यांनी समाधान मानले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक करण्यात आली त्यांनीही आपल्या खोट्या सह्या असल्याबद्दल कोणतेही पाऊल उचललेले नाही.
या प्रकरणाबाबतची एकूण शांतता आणि उदासीनतापाहता पालिकेचे काही अधिकारीसुद्धा अशा प्रकारात सामील असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. म्हणूनच कदाचित कारवाई करायला विलंब केला जात असेल किंवा टाळले जात असेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला असून मुख्यमंत्री कार्यालयाला याबाबत निवेदन दिले आहे.