Breaking News Latest updates loading...

वाहतुकीच्या कोंडीची समस्येत हाॅटेलवाल्यांच्या व्हॅलेट पार्किंगची भर

पालिका आयुक्तांकडे तक्रार 


पुणे: शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यात व्हॅलेट पार्किंगची (Valet Parking) भर पडली असून  हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये तुमची गाडी पार्क करण्यासाठी असणारा नियुक्त सेवक ग्राहकांच्या गाड्या सार्वजनिक रस्त्यांवर पार्क करतो. हॉटेल व्यवसायिक अरुंद गल्ल्यात व्हॅलेट पार्किंग उपलब्धच्या नावाखाली गाड्या लावतात व त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सार्वजनिक रस्त्यांवरील व्हॅलेट पार्किंग बाबत तसेच साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेसेस मधील अनधिकृत वापराबाबत 
पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे.

मनपाचे कचखाऊ धोरण आणि अनधिकृत व्यवसायावर कठोर कारवाईसाठीची अनास्था हे मुख्य कारण असल्याचे दिसून येते.
शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता सर्वत्र साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन व पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले असून येथे अनधिकृतपणे व्यवसाय केला जातो. नागरिकांनी आवाज उठविल्यावर मनपा तोंड देखली कारवाई करते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असतानाही प्रशासन हे करत नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. उदाहरणार्थ गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर ( फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ) तर व्यवसायिक इमारती अथवा प्रसिद्ध रेस्टॉरंट मधील पार्किंगची जागा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्थिती आहे. या रस्त्यावर वारंवार कारवाई होऊन सुद्धा ही परिस्थिती जैसे थे आहे,असे निवेदनात नमूद केले आहे.


खर्डेकर यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कोथरूडच्या करिष्मा सोसायटी परिसरासह एरंडवण्यातील अनेक भागात नागरिक वाहतूक पोलिसांसह भेट दिली असता ही बाब प्रकर्षाने जाणवली. विशेषत: 
यावर त्वरित कारवाई व कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास शहराची वाहतुकीची स्थिती अधिकच गंभीर होत जाईल हे स्पष्ट दिसते आहे.