मुस्लिमांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन
पुणे: गाईला "राष्ट्रीय प्राणी" चा दर्जा दिला गेला पाहिजे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहरातील मुस्लिम सामाजिक संघटना, आजी-माजी नगरसेवक, मुस्लिम धर्मगुरू यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना गाईला 'राष्ट्रीय प्राणी' घोषित करून देशातील मॉब लिंचिंग, द्वेषाचे राजकारण थांबवणे आणि सामाजिक सलोखा टिकवण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की गाईला 'राष्ट्रीय प्राणी' चा दर्जा मिळावा यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घेऊन गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा, जेणेकरून तिच्या संरक्षणाची जबाबदारी कायदेशीररीत्या शासनाची असेल.
गुंडगिरी व हिंसेला आळा बसावा: गाईच्या नावावर कायदा हातात घेऊन निष्पाप माणसांना मारहाण करणाऱ्या आणि हत्या करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
धर्माच्या नावावरील राजकारण थांबवावे. गो-रक्षणाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करून एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्याचे कारस्थान थांबवले जावे. गाईला "राष्ट्रीय प्राणी" घोषित केल्यास या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण तोडगा निघू शकेल. यामुळे ना कोण्या निष्पाप माणसाचा जीव जाईल, ना गाईचा अवमान होईल आणि धर्माच्या नावावर होणारे घाणेरडे राजकारणही कायमचे बंद होईल.
