विषारी गावठी दारूमुळे हडपसर मध्येही बळी
पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू हा विषारी गावठी दारूमुळे झाल्याचे समजते.
गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे.
दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांड प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
पुणे पोलीस उपायुक्तांनी या मृत्यूकांडाच्या माहितीला दुजोरा दिला. दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११ आहे. यात पिंपरीतील ६ आणि हडपसरच्या ५ जणांचा समावेश आहे. बाकी इतर मृत्यू हे वेगवेगळ्या कारणाने झाले आहेत. यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तसेच या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला , अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली.
अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवले होते. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे
तर याच विषारी दारूमुळे हडपसर मधील ५ जण दगावले. त्यांच्यापैकी अनेक लोकांना गावठी दारू प्यायल्यावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता.
राहुल शरद क्षीरसागर (४५)
विजय भूकुरलाल शर्मा (४५) अरुण डाडर ( सर्व राहणार हडपसर)
अशोक रमेश चव्हाण ( रा. काळेपडळ)
पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे ( फुगेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटल आणि अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
फुगेवाडीत एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यू
फ्लोरिडात रॉकेटचा प्रचंड स्फोट
वाॅशिंग्टन : फ्लोरिडाच्या लॉन्च कॉम्प्लेक्स ३६ येथे एका स्थिर अग्नि चाचणीदरम्यान न्यू ग्लेन रॉकेटचा स्फोट झाला. या प्रचंड स्फोटामुळे बूस्टर पूर्णपणे नष्ट झाला आणि लॉन्चपॅडचेही नुकसान झाले, परंतु सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे भोपाळ येथे निधन
भोपाळ: प्रख्यात कवी आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे गुरुवारी दुपारी भोपाळ येथे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी, बशीर बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतिभ्रंशाचा त्रास होता आणि त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांनी आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य आणि काव्यविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
बऱ्याच काळापासून ते स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते आणि त्यांच्या साध्या, हृदयस्पर्शी गझलांसाठी साहित्यविश्वात ते सदैव स्मरणात राहतील. साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री (१९९९) आणि साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या गझलांची शैली साधी आणि सहज होती, जी थेट हृदयाला भिडणारी होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने देश-विदेशातील साहित्यप्रेमी आणि चाहत्यांमध्ये धक्का बसला आहे.
त्याच्या काही सर्वात लोकप्रिय आणि अजरामर ओळी खालीलप्रमाणे आहेत:
ख़ुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे..
अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना
हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है..
अगर तलाश करूँ कोई मिल ही जाएगा
मगर तुम्हारी तरह कौन मुझ को चाहेगा..
कभी कभी तो छलक पड़ती हैं यूँही आँखें
उदास होने का कोई सबब नहीं होता..
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में.. ..
ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है ज़मीं
पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है..
देशात एकूण मृत्यूंपैकी ३२.१ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे
ताण, धूम्रपान, मद्यपान, जंक फूड, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे
नवी दिल्ली: भारतात बदलती जीवनशैली, ताणतणाव, अयोग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे आता एक गंभीर आरोग्य संकट बनत आहे. जनगणना महालेखापरीक्षकांच्या 'भारतातील मृत्यूची कारणे २०२२-२४' या अहवालानुसार, देशात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असून, हे प्रमाण ३२.१ टक्के आहे. याचा अर्थ, दर तीन मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होतो.
या अहवालात असेही दिसून आले आहे की, उत्तर भारतातील परिस्थिती सर्वात चिंताजनक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर वेळेवर प्रतिबंध आणि जनजागृतीचे प्रयत्न केले नाहीत, तर येत्या काही वर्षांत हे संकट अधिकच गंभीर होईल.
जनगणना महालेखापरीक्षकांच्या अहवालानुसार, भारतात हृदयरोग हे सर्वाधिक मृत्यूंचे कारण असून, हे प्रमाण ३२.१ टक्के आहे. उत्तर भारतात परिस्थिती सर्वात गंभीर आहे. या अहवालात श्वसनसंस्थेचे आजार, मधुमेह, पचनसंस्थेचे आजार आणि क्षयरोग यांनाही मृत्यूची प्रमुख कारणे म्हणून सूचीबद्ध केले आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, चुकीची जीवनशैली आणि तणावामुळे येत्या काही वर्षांत हे आरोग्य संकट अधिक गंभीर होऊ शकते.
हृदयविकाराचे रुग्ण का वाढत आहेत?
अहवालानुसार, देशात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. उत्तर भारतात हृदयविकारामुळे होणारा मृत्यूदर ३५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मध्य भारतात तो २४.१ टक्के आहे. डॉक्टरांच्या मते, सततचा ताण, धूम्रपान, मद्यपान, जंक फूड, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. अगदी तरुण वयातही लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह झपाट्याने वाढत असून, त्याचा थेट परिणाम हृदयावर होत आहे.
कोणत्या आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत?
अहवालात असेही म्हटले आहे की, हृदयरोगानंतर इतर अनेक गंभीर आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. श्वसनसंस्थेच्या आजारांमुळे ६ टक्के, पचनसंस्थेच्या आजारांमुळे ५.९ टक्के आणि श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे ५.७ टक्के मृत्यू होत आहेत. मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या ४.८ टक्के दक्षिण भारतात नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर, अज्ञात ताप, दुखापत आणि जननमूत्रसंस्थेचे आजार हीदेखील मृत्यूची प्रमुख कारणे बनत आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, क्षयरोग हा देखील एक गंभीर धोका असून, त्यामुळे एकूण मृत्यूंपैकी २.६ टक्के मृत्यू होत आहेत.
देशात आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे
मृत्यूची टक्केवारी
हृदयरोग :३२.१ टक्के
श्वसन रोग :६ टक्के
पाचक प्रणाली रोग : ५.९
श्वसन संक्रमण ५.७
मधुमेह ३.६
दुखापत ४.१
क्षयरोग २.६
पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक होता का?
या अहवालातून पुरुष आणि महिलांवर होणाऱ्या आजाराच्या परिणामातील फरकही उघड झाला आहे. पुरुषांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांमुळे ७.७ टक्के मृत्यू झाले, तर महिलांमध्ये हा आकडा ३.४ टक्के होता. पुरुषांमधील ३.८ टक्के आणि महिलांमधील २.९ टक्के मृत्यू जननमूत्रमार्गाच्या आजारांमुळे झाले. तज्ञांच्या मते, पुरुषांमधील धूम्रपान, मद्यपान आणि उच्च पातळीचा ताण अनेक आजारांचा धोका वाढवतात. महिलांमधील आरोग्य तपासणीकडे होणारे दुर्लक्ष हीदेखील चिंतेची बाब आहे.
सुधारलेल्या आरोग्य सेवांमुळे चित्र बदलले आहे का?
अहवालात असेही म्हटले आहे की, तरुण वयातील मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे आणि लोक पूर्वीपेक्षा जास्त काळ जगत आहेत. याचे श्रेय सुधारित उपचार, लसीकरण आणि विस्तारित आरोग्य सेवा यांना दिले जाते. तथापि, वृद्धांमधील मृत्यूंची संख्या वाढली आहे. ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अज्ञात कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, सुधारित आरोग्य सुविधा असूनही, जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. उत्तम आरोग्य सुविधा असूनही, जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत, जे भविष्यासाठी एक मोठा धोका बनू शकतात.
काय सूचना केल्या आहेत?
हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लोकांनी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव कमी करणे यांसारख्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. लहान मुले आणि तरुणांमधील मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य कार्यक्रम अधिक मजबूत करण्याची शिफारसदेखील या अहवालात करण्यात आली आहे. जनजागृती आणि प्रतिबंधावर भर दिल्यास मोठ्या संख्येने जीव वाचवता येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
खासगी वस्त्या झोपडपट्टी सदृश्य दाखवून एसआरए योजनेतून टीडीआरची फॅक्टरी
'आपले पुणे आपला परिसर' ची पालिका आयुक्तांकडे तक्रार
पुणे: खाजगी मालकीचे वाडे, घोषित नसणाऱ्या खाजगी मालकीच्या वस्त्यांना झोपडपट्टी सदृश्य दाखवून एसआरए योजना मान्य करण्यात येतात. त्यामुळे महानगरपालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. मनपाचे उत्पन्न बुडत आहे आणि टीडीआरची फॅक्टरी चालू आहे या दोन्ही त्रासातून मुक्तता करायची असेल तर आपणास हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही अशी तक्रार 'आपले पुणे
आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेने
पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे अनिर्बंध सत्तेचे ठिकाण नाही. पुण्यातील सर्व पेठांच्या मध्ये बिनधास्तपणे झोपडपट्टी दाखवून काम करण्याचा मोठा प्रयत्न ठराविक विकसक आणि अधिकारी मिळून करत आहेत.
आपण तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली.
माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी माजी नगरसेवक प्रशांत बधे या संस्थेचे पदाधिकारी आहेत.
केसकर यांनी सांगितले की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे शहरातील ज्या ठिकाणी खाजगी मालकीचे वाडे-वस्त्या आहेत ती जागा झोपडपट्टी सदृश्य आहे असे दाखवून महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात ज्या ठिकाणी आरक्षण आहेत अशा सर्व ठिकाणी झोपडपट्टी सदृश्य अशी कायद्यातील पळवाट काढून आपल्या उपायुक्तांचा अहवाल घेऊन योजना मंजूर करीत आहे, ही गंभीर बाब आहे.
दहा हजार चौरस फुटाचा एक प्लॉट जर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जाहीर केला तर महानगरपालिकेचे किमान साडेचार कोटी रुपयांचे (बांधकाम शुल्क) नुकसान होते.
पुण्यातील अशा असंख्य वाड्यांना बिल्डिंगना सध्या परवानगी देण्याचा धडाका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सुरू केला आहे.
यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याला लेखी स्थगिती दिली होती तरी देखील जोरदारपणे झोपडपट्टी सदृश्य योजनांना परवानगी देण्याचे काम मनापासून सुरू आहे, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.
घोषित नसलेली कुठलीही जागा जर झोपडपट्टी म्हणून जाहीर करणार असतील तर त्यावर पुणे महानगरपालिकेने हरकत घेतली पाहिजे आपण आपल्या उपायुक्तांंना एनओसी देण्यापूर्वी आयुक्तांची लेखी परवानगी घ्यावी असे आदेश द्यावेत. मनपाचे उत्पन्न बुडत आहे आणि टीडीआरची फॅक्टरी चालू आहे या दोन्ही त्रासातून मुक्तता करायचे असेल तर आपणास हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही. आपण तातडीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त यांनी दिलेले अहवाल मागवून त्याची शहानिशा करेपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
'दीनानाथ'च्या कल्वर्ट बाबत "प्रायमूव्ह" कडून पारदर्शक सर्वेक्षण करून अहवाल खुला करणार
संदीप खर्डेकर यांची माहिती
पुणे: नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा आणि नालेसफाईचे काम वेगाने पूर्ण करा अशा सूचना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. या वर्षी जर नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटी मध्ये शिरले तर मी स्वतः जनआंदोलन उभारेन व कामचुकार पणा करणाऱ्यांवर कारवाई साठी आग्रही राहीन असेही त्या म्हणाल्या.
म्हात्रे पुल ते राजाराम पुल या डीपी रस्त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्त्याचे व तेथील नाल्यावर कल्वर्ट ( छोटा पुल ) बांधण्याचे काम सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आज कामाची पाहणी करण्यात आली त्यावेळी दीनानाथ रुग्णालय व मनपा प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्या.
दीनानाथ रुग्णालयातर्फे बांधण्यात येत असलेल्या कल्वर्ट मुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन त्याचा फुगवटा होऊन अरुंद नाल्यातील पाणी पावसाळ्यात नाल्यालगतच्या सोसायटीत शिरण्याची शक्यता आहे. याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी 'प्रायमूव्ह' चे अजित ओक यांना संपर्क केला व त्यांनी याबाबत त्वरित पाहणी करून वास्तुनिष्ठ अहवाल देण्याचे मान्य केले. याच ठिकाणी नाल्यातील सिमेंट ब्लॉक व अन्य डबर त्वरित काढावे अशी सूचना संदीप खर्डेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला केली. ते आम्ही तातडीने करून घेऊ असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. योगेश भोपे, अभियंता अमोल साने, वारजे कर्वेनगरच्या सहाय्य्क आयुक्त अस्मिता तांबे,उपअभियंता विनायक शिंदे,कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे, नालेसफाई चे शुभम असवले, कनिष्ठ अभियंता रोहन दिवटे,भाजपा च्या प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुयश गोडबोले, वैभव जमदाडे,मंडल उपाध्यक्ष अनघा जगताप, निलेश घोडके,दिनेश जगताप,शेखर वीर,रुपालीताई मगर यांच्यासह वकीलनगर, सुशीलानगरी,हिमाली, संकुल, संजीवनी व इतर सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक पुनीत जोशी व नगरसेवक सुनील पांडे यांनी नालेसफाईसह नाल्यातून सुरू असलेल्या मलवाहिनीच्या कामाची झाडाझडती घेतली व सर्व प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुढील आठवड्यात मलवाहिनी टाकण्याच्या कामाची विस्तृत माहिती सादर करण्याबाबत व प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याबाबत सूचना केल्या.
विकास लवांडे यांना अखेर जामीन मंजूर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांना पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलीशा बागल यांनी मंगळवारी जामीन मंजूर केला.
सदर आदेशामुळे बेकायदेशीर अटक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासंदर्भात महत्त्वाचा संदेश गेला असल्याची चर्चा न्यायवर्तुळात सुरू आहे.
वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळून, विकास लवांडे यांना अटक केली होती. सदर कारवाई ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांचे उल्लंघन करणारी, कायद्याच्या प्रक्रियेविरुद्ध व बेकायदेशीर असल्याचा ठोस युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
जिल्हा न्यायालयात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करून विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करून घेण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. बचाव पक्षाचे ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा तसेच अटकेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचा सविस्तर आधार देत प्रभावी बाजू मांडली.
सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने विकास लवांडे यांना रुपये ३० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
तसेच, भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही तसेच कायमस्वरूपी वास्तव्यासंदर्भातील पत्ता न्यायालयात सादर करावा, या दोन अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. हर्षवर्धन पवार आणि ॲड. सारंग बहिरट यांनीही महत्त्वपूर्ण काम पाहिले.



