पुणे : मागील एक महिन्याच्या कालावधीमध्ये दूध खरेदीमध्ये प्रति लिटर ४ रुपयांनी वाढ झाली असल्याने मार्केटमधील पाऊच (पिशवी) विक्री दर वाढविणे अपरिहार्य आहे. १ मार्च २०२६ रोजी पासून गाय व म्हैस दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची मिटिंग पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये प्रमुख सहकारी व खाजगी २५ संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच उपपदार्थांची दरवाढ ही त्या अनुषंगाने होईल. खरेदीची ४ रुपये दरवाढ असताना संस्था पातळीवर १ रुपया व डीलरच्या कमीशनमध्ये १ रुपया असे २ रुपये सहन करून ग्राहकांना मात्र फक्त २ रुपयांची दरवाढ करणेचे ठरविलेले आहे.
शासनाच्या अन्न व औषध विभागाने दूध व दुग्धजन्य पदार्थ (दूध, पनीर, तूप) भेसळीवर तपासणी करणेचे काम सुरु केलेले आहे. तसेच नजिकच्या कालावधीमध्ये दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे वतीने अन्न व औषध आयुक्त, दुग्धविकास मंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्यासोबत मिटींग घेण्याचे ठरविण्यात आलेले आहे.