News Portal

राहुल गांधी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर कथित बदनामी प्रकरण

सीडीऐवजी पेन ड्राईव्ह देण्यात आल्याचे सावरकरांनी कोर्टात मान्य केले

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते  राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर  सावरकर यांच्या संदर्भातील कथित बदनामी प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. न्यायालयात यापूर्वी सादर करण्यात आलेली भाषणाची सीडी तपासल्यावर ती ब्लँक (रिकामी) असल्याचे स्पष्ट झाले. 

या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू फिर्यादी सात्त्विकी सावरकर यांचा उलट तपास आज न्यायालयात नोंदविण्यात आला.
उलट तपासादरम्यान राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी विविध तांत्रिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी फिर्यादींकडून काही महत्त्वाच्या बाबी मान्य करण्यात आल्या.

न्यायालयात यापूर्वी सादर करण्यात आलेली भाषणाची सीडी तपासल्यावर ती ब्लँक (रिकामी) असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, याच सीडीच्या आधारे राहुल गांधी यांना समन्स बजाविण्यात आले होते. सीडी हा या प्रकरणातील महत्त्वाचा तांत्रिक पुरावा असल्याने त्याची प्रत बचाव पक्षाला देण्याची मागणी अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी केली होती. मात्र, सीडीऐवजी पेन ड्राईव्ह देण्यात आल्याचे फिर्यादींनी आज उलट तपासात मान्य केले.

 तसेच फिर्यादींकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या यूट्यूब लिंकसंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार आवश्यक असलेले कलम ६५-ब अंतर्गत प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नव्हते, ही बाबही उलट तपासादरम्यान समोर आली.

 खटला दाखल करताना संपूर्ण प्रकरण संबंधित सीडीवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र त्यावेळी पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर नव्याने पेन ड्राईव्ह सादर करण्यात आल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आली.

याशिवाय, सादर करण्यात आलेल्या ६५-ब प्रमाणपत्रांवर कोणत्याही तांत्रिक तज्ज्ञ किंवा अधिकृत व्यक्तीची सही नसल्याचेही उलट तपासादरम्यान स्पष्ट झाले असून, ही बाब फिर्यादींनी मान्य केली आहे. या प्रकरणातील फिर्यादींच्या पुढील उलट तपासासाठी न्यायालयाने २५ मार्च २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.