News Portal

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची निर्दोष मुक्तता

ब्राह्मण समाजा विरोधात भडकावू लेखनाचा 
आरोप

पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती पी. बी. पाटील यांनी मराठा सेवा संघ,संस्थापक पुरुषोत्तम सूर्यभान खेडेकर (वय- ७७ रा. जिजाऊ प्रकाशन नारायण पेठ) व प्रकाशक किशोर साहेबराव कडू (वय- ४२ रा. पुणे यांची ब्राह्मण समाजाविरोधात भडकावू पुस्तकाचे लेखन केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली.

  पुरुषोत्तम खेडेकर यांनी "शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे" या शीर्षकाखाली एका पुस्तकाचे लेखन केले होते. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे व विधानसभेचे छायाचित्र छापलेले आहे. पुस्तकात ब्राह्मणी व्यवस्थे विरूध्द लिखाण केले होते.

 पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे या पुस्तकामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दंगली होतील असे वाटल्याने भाजपाचे माजी नगरसेवक शाम सातपुते यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे येथे खेडेकर व कडू यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.         
               
या खटल्याचे काम पहाण्यासाठी सरकारच्या वतीने विशेष व जेष्ठ सरकारी वकिलांची नेमणूक केली होती. ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी श्री. खेडेकर व कडू यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.
             
जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने पुण्यामध्ये येऊन भांडारकर इन्स्टिट्यूट मधून माहिती घेऊन " शिवाजी; द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या नावाचे पुस्तक लिहून प्रकाशित केले होते. त्या पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांच्या विषयी चुकीची माहिती व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी माहिती पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूट मधील काही लोकांनी जाणीवपूर्वक जेम्स लेन या लेखकाला माहिती पुरवली होती, असे जेम्स लेन यानेच जाहीर केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या विषयी अतिशय घाणेरडे लिखाण जेम्स लेन याने केले व त्याला पुण्यातील ब्राह्मणांनी मदत केली त्या द्वेषातून 'शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे ' या पुस्तकाचे या शीर्षकाखाली त्या रोषातून  खेडेकर यांनी ते पुस्तक लिहिले असे पोलीस तपासात खेडेकर यांनी पोलिसांना सांगितले होते.
            
पुणे येथील न्यायालयामध्ये "शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे" हे पुस्तक खेडेकर यांनीच लिहिले व कडू यांनीच ते प्रकाशित केल्याचे सरकार पक्षाला सिद्ध करण्यास अपयश आले. लिखाणाचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे त्या पुस्तकावरून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण झाली किंवा दंगली झाल्या असे काही घडलेले नाही. फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी फिर्याद व खोटा खटला पुरुषोत्तम खेडेकर व किशोर कडू यांच्या विरोधात दाखल केला.
            
खटला गंभीर नसताना किंवा कुठलेही संयुक्तिक कारण नसताना फक्त सत्तेचा गैरवापर करून या खटल्यात जाणीवपूर्वक मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विरोधात विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली असल्याचा युक्तिवाद ॲड. मिलिंद पवार, ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार, ॲड. सुयोग गायकवाड, ॲड सारंग बहिरट, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव यांनी केला. वरील युक्तिवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.