News Portal

भोर आणि हवेली पंचायतीवर राष्ट्रवादीचे सभापती

भोर मध्ये चिठ्ठी बाजूने तर हवेलीत अपक्षाचा पाठिंबा 

पुणे: भोर आणि हवेली तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाची निवड सोमवारी झाली. हवेलीत अपक्षाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर भोर मध्ये बहुमत नसतानाही चिठ्ठी बाजूने पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला

भोर पंचायत समितीमध्ये मनिषा कंक सभापती पदी तर विशाल कोंडे उप सभापती झाले. संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ही निवडणूक 'चिठ्ठीवर' निश्चित करण्यात आली होती. चिठ्ठीद्वारे नशीब आजमावण्यात आले. नशिबाने साथ राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. 

भोर नगरपालिका अध्यक्षपदानंतर आता पंचायत समितीचे अध्यक्षपद देखील हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटेंना धक्का बसला. तर आमदार शंकर मांडेकर यांना नशिबाची साथ मिळाली.

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. 

हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ७ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक होते.  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी केवळ एक जागेचा पेच राष्ट्रवादी काँग्रेससमोर होता. अपक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ता येत असल्याचे दिसताच बैठका सुरु होऊन विद्या गायकवाड यांना उपसभापतीपद देण्याचे ठरले.

पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.