पुणे, दि.२० (प्रतिनिधी) - पुणे शहरात विमान अपघाताची टांगती तलवार ठेवून विकासक आणि महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चक्क बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या जीवावर इमारतींचे जंगल उभे केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. देशाच्या सुरक्षेशी आणि पुणेकरांच्या जिवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांना जेलमध्ये टाका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी निवेदन दिले आहे.
शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरात उंच इमारतींना दिलेल्या मंजुरीमध्ये मोठे गौडबंगाल आहे. एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेचे डोळे उघडताना स्पष्ट सांगितले की, आंबेगाव येथील प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी ही 'कंप्लिटली फेक' (पूर्णपणे बनावट) आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आले आहेत. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाही, पुणे महापालिका प्रशासन अशा गंभीर विषयावर कुंभकर्णी झोप घेत असल्याचे चित्र आहे.
चौकट
प्रशासनाचे घोटाळेबाजांना अभय?
या महाघोटाळ्याप्रकरणी ६ एप्रिल रोजीच पुरावे देऊनही महापालिका आयुक्त आणि मुख्य अभियंत्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. एकीकडे एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात आहेत, तर दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. हा थेट राष्ट्रद्रोहाचा प्रकार आहे, अशा शब्दांत अनंत घरत यांनी आपला संताप व्यक्त केला.
मंत्री मोहोळ यांनी चौकशी करावी
खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या उंच इमारतींना प्रशासनाने तात्काळ टाळे ठोकावे आणि दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा पुण्याच्या रस्त्यावर शिवसैनिक उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही घरत यांनी दिला.
बनावट एटीसी परवानग्यांचा महाघोटाळा
April 20, 2026
Yogesh J