कोकणात ६ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होणार
पुणे: रणरणत्या उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रवासियांना दिलासा देणारी बातमी पुढे आली. २०२६ च्या मॉन्सून हंगामाची सुरुवात.झाली असून मॉन्सून एकाच वेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात दाखल झाला .निकोबार बेटांसह अंदमान बेटांचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापला आहे.
पुढील ३-४ दिवसांमध्ये दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची आणखी प्रगती अपेक्षित आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन लांबणार नसून, उलट तो नियोजित वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज आहे.
अनुकूल वातावरणामुळे मान्सून वेळेआधीच अंदमानात धडकला आहे. मान्सून साधारणपणे ३१ मे किंवा २६ मे दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात ६ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. सध्याच्या तापमानातून आणि उष्णतेच्या लाटेतून लवकरच नागरिकांची सुटका होण्याचे संकेत या हवामानाच्या अंदाजावरून मिळत आहेत.
विदर्भासह महाराष्ट्र यंदा उन्हाळ्यात होरपळलेला आहे. अकोला, जळगाव, चंद्रपूर, नागपूर आदी जिल्ह्यांत कमाल तापमान ४२ ते ४६ अंश सेल्सिअस नोंदवले जात असून जनजीवन विस्कळित झाले आहे.
