विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सोहळा
पुणे : शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर आक्रमक भूमिका घेत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू, असा निर्धार पुणे शहर काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. काँग्रेस भवन येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पदग्रहण समारंभात प्रशांत जगताप यांनी पुणे (पूर्व) शहराध्यक्ष, तर दीप्ती चवधरी यांनी पुणे (पश्चिम) शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पुणे शहर-जिल्हा प्रभारी सतेज (बंटी) पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पदग्रहणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वजीत कदम, प्रशांत जगताप आणि दीप्ती चवधरी यांनी पुण्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. शहरातील वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, प्रदूषण, अपुरी नागरी सुविधा आणि प्रशासनातील नियोजनशून्यता यामुळे पुणेकर त्रस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या धोरणशून्य कारभारामुळे शहराची अवस्था बिकट झाली असून, जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही करण्यात आली.
देशातील महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांसमोरील संकटांवरही काँग्रेस नेत्यांनी भाष्य केले. सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले असताना केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नांपासून दूर असल्याचा आरोप त्यांनी केला. आगामी काळात काँग्रेस पक्ष संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधणार असून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाल तिवारी, महापालिकेतील गटनेते चंद्रकांत कदम, नगरसेविका दिपाली डोख, सायरा शेख, नगरसेवक काशिफ सय्यद, मोहसीन शेख, मजहर मणियार, प्रवक्ते हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, महेबूब नदाफ, रफिक शेख, साहिल केदारी, सुनील शिंदे, अश्विनी लांडगे, वैशाली भालेराव, उस्मान तांबोळी, अमीर शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpeg)