News Portal

जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजीनगर न्यायालयात स्नेहसंमेलन उत्साहात

पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे बार असोसिएशनतर्फे सोमवारी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील अशोका हॉल येथे विविध उपक्रम आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शक्तीचा जागर आणि महिला वकिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी होत्या, तर मुख्य व्याख्यात्या म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी उपस्थित होत्या.

दिवसाची सुरुवात महिला वकिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराने झाली, ज्यामध्ये अनेक वकिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर आयोजित 'काव्यरंग' या उपक्रमात महिला वकिलांनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड.  राम भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शालिनी फणसळकर-जोशी यांनी कायदेशीर क्षेत्रातील महिलांचे योगदान आणि आव्हाने या वर मार्गदर्शन केले. मृणाल कुलकर्णी यांनी स्त्रीत्वाचा सन्मान आणि सामाजिक जाणीवेवर भाष्य केले.

 पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. प्रताप मोरे, ॲड. प्रीतीसींग परदेशी, सचिव ॲड. सम्राट जांभूळकर, ॲड. अभिजित पोळ, ऑडिटर ॲड. शिवराज निंबाळकर,खजिंदार अंजली बांदल आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. योगेश जैन ॲड. प्रितेश दळवी आदी व्यासपीठावर होते.

ॲड.प्रियंका घाडगे व ॲड.स्मिता वाघमारे यांनी प्रमुख उपस्थित पाहुणे यांची ओळख करुन दिली. सूत्रसंचालन ॲड .नेहा जांभळे व ॲड.गुंजन भोसले यांनी केले. आभार ॲड.पूजा पवार व ॲड.शीतल देशमुख यांनी मानले.

सामाजिक कृतज्ञता निधी सामाजिक कार्यासाठी ९० सामाजिक संस्थांना ३९ लाखांचा निधी समर्पण




पुणे : शिक्षण नसल्याने नक्षलवाद फोफावला असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदालयच्या भारती ठाकूर यांनी केले.भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित नवी पेठ येथील निवारा सभागृहात सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून भारती ठाकूर बोलत होत्या. नव्वद संस्थांना यावेळी ३९ लाखांचा  निधी समर्पण करण्यात आला.

त्या म्हणाल्या "आमच्या शाळांतून व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते आणि आमचा अभ्यासक्रम आम्हीच बनवला असून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते.पाठांतरावर भर दिला जातो.''

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना ह्यांनी यावेळी आपले विचार मांडले. ते असे म्हणाले," बँक ऑफ महाराष्ट्रने प्रगतीचा खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि बँक येत्या दोन ते तीन वर्षांत अजून प्रगतीची वरची श्रेणी मिळवायचा प्रयत्न करीत आहे."
सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची "बोमरेओ" संघटना करीत असलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन बँक देखील सामाजिक जबाबदारी म्हणूनअसे उपक्रम करायचा विचार करत आहे"

या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक  बाळासाहेब फडणवीस,नारायण अचलेरकर,मोहन घोळवे, भास्कर माणकेश्वर,डॉ सुनील देशपांडे,ह्यांची मुख्य उपस्थिती होती. प्रारंभी भारती ठाकूर यांचा परिचय सुलभा कुलकर्णी ह्यांनी तर बँकेचे कार्यकारी संचालक व व्यवस्थापकीय संचालक निधु सक्सेना यांचा परिचय डॉ सुनील देशपांडे ह्यांनी  करून दिला.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील उपेक्षित,दिव्यांग,गतिमंद,कृषी,आरोग्य,क्रीडा,पर्यावरण,गो-सेवा,शैक्षणिक आदि सामाजिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना ह्या संघटनेच्या सदस्यांनी स्वतः निधी गोळा करून आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत केली असल्याचे महासचिव नारायण अचलेरकर ह्यांनी ह्यावेळी सांगितले.पद्मश्री डॉ सुनीता गोडबोले यांच्या बस्तर येथील वनवासी बांधवांसाठी केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल व केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
ह्याप्रसंगी रौप्यमहोत्सवी स्मरणिका साठी विशेष योगदान देणाऱ्या डॉ चंद्रशेखर बारगजे,माधव लेले व मधुसूदन निमकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास संपूर्ण भारतातून बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उच्चपदस्थ,कर्मचारी,अधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अकरा गावांसाठी ११५ कोटी रुपये खर्च; तरीही नाले मैलापाण्याने तुडुंब

'आपले पुणे आपला परिसर' ची तक्रार 

पुणे: अकरा गावांसाठी ११५ कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजची समस्या या गावांच्या मध्ये असेल आणि नाले मैलापाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत तर नेमके काम काय झाले याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी 'आपले पुणे आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेने स्थायी समितीकडे केली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर , सुहास कुलकर्णी माजी नगरसेवक प्रशांत बधे हे या संस्थेचे पदाधिकारी आहेत‌.

प्रशासकराज मध्ये मलनि:सारण ५७१.९५ कोटी आणि मलनिःसारण प्रकल्प ५७४ कोटी असे ११४५.९५ कोटी खर्च झाले असे आकडे आहेत. याबाबत प्रशासनाकडून
सविस्तर माहिती घ्यावी. आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकातील आकडे तपासताना ही बाब लक्षात आली, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.

केसकर यांनी सांगितले की आपण जर पाहिले तर सर्व नाल्यांमधून नदीकडे ड्रेनेजचे पाणी जाताना दिसते, याचा अर्थ ड्रेनेज लाईनचे नेटवर्क नीट जोडले गेले आहे का नाही याची देखील विचारणा करावी. 
सल्लागारांनी तयार केलेला सविस्तर अहवाल, टेंडरची कॉपी, प्रत्यक्ष जागेवर झालेले काम अधिकाऱ्यांनी तपासून तयार केलेली बिले ही एकदा नीट तपासणी करणे आवश्यक आहे. 
एक-दोन कंत्राटदार आणि वर्षानुवर्ष त्या खात्यामध्ये बसलेले अधिकारी यांच्या संगनमताने हे होत नाही ना हे देखील तपासले पाहिजे.

 कंत्राटदाराच्या ईनोव्हा कारचे गूढ

ड्रेनेज प्रकल्प विभागाने ड्रेनेजचा मास्टर प्लॅन हा ११ गावे अधिक २३ गावे नंतर समाविष्ट झालेले तयार करून टेंडर काढले होते. 
तसेच जे अधिकारी ११ गावांना काम बघत होते त्यांना बोगस कामे केल्यामुळे २३ गावातील प्रकल्पातून वगळण्यात यावे.मलनि:सारण या खात्याच्या एका कार्यकारी अभियंता कडे आणि एका उपअभियंता सारख्या अधिकार्‍यांच्याकडे प्रकल्पाच्या नावाखाली अधिकृत कंत्राटदाराच्या ईनोव्हा कार आहेत त्याबाबत देखील माहिती घ्यावी. तसेच 'एसडी'ची कामे कधी पूर्ण होणार की आयुष्यभर चालूच राहणार आहे याचाही अहवाल मागविणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेत शिवसेना

 गटनेतेपदी सुवर्ण दरेकर

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना शिंदे गट पक्षाच्या गटनेतेपदी पदाची धुरा महिलेकडे दिली असून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पेठ गटामधून निवडून आलेल्या सुवर्णा देविदास दरेकर यांची गटनेता  निवड करण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हा परिषदेमध्ये पाच सदस्य असून त्यांच्या गटाची नोंदणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

गटनेता म्हणून सुवर्णा दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, देविदास दरेकर, रमेश कोंडे त्याचबरोबर सदस्य मंगेश काकडे, रूपाली कोंडे, स्मिता कणसे, नेहा पाटील, सुवर्ण दरेकर हे शिवसेनेचे पाचही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.


 सुवर्णा दरेकर म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील योजना आणि कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे प्राधान्य राहील. सभागृहातील आणि प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता यावी, योजना राबवताना कुठेही अनुशेष अथवा विशिष्ट विभागावर अन्याय होणार नाही. यावर देखील आम्ही लक्ष ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न करू.

धायरीत परांजपे बिल्डरला दणका

 माहिती अधिकारातून कारवाई

पुणे : धायरी येथील अभिरुची परांजपे स्कीम परिसरातील म्हाडाच्या सोसायट्यांमधील मैला मिश्रित सांडपाणी एसटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया न करता जवळील सोसायटी परिसरात सोडले जात असल्याची बाब समोर आली. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला होता.या संदर्भात दक्ष नागरिक मंच यांनी पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांकडे दिनांक १० सप्टेंबर २५ रोजी लेखी तक्रार केली होती.


तक्रारीवर कार्यवाही करण्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंचाचे समन्वयक सुरेश भाले यांनी २ फेब्रुवारी २६ रोजी जनमाहिती अधिकारी, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केला.या अर्जाच्या अनुषंगाने दिनांक २ मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटीपी प्लांट अद्याप सोसायट्यांना हस्तांतरित करण्यात आलेला नसून त्याची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी अभिरुची परांजपे स्कीमच्या व्यवस्थापनाकडेच आहे, असे समजले.

सोसायट्यांमधील मैला मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून आरोग्यास घातक परिस्थिती निर्माण केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेने संबंधित व्यवस्थापनास १ लाख दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. 

दंड न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कलम चॅप्टर १४ नियम ३ (फ) नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी नोटीसही बजावण्यात आली आहे.दरम्यान, ज्या सोसायट्यांतील सदस्यांनी तक्रार केली होती त्यांच्याकडे चौकशी केली असता अद्यापही समस्येचे पूर्ण निराकरण झालेले नसल्याचे समोर आले आहे.

भोर आणि हवेली पंचायतीवर राष्ट्रवादीचे सभापती

भोर मध्ये चिठ्ठी बाजूने तर हवेलीत अपक्षाचा पाठिंबा 

पुणे: भोर आणि हवेली तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाची निवड सोमवारी झाली. हवेलीत अपक्षाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर भोर मध्ये बहुमत नसतानाही चिठ्ठी बाजूने पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला

भोर पंचायत समितीमध्ये मनिषा कंक सभापती पदी तर विशाल कोंडे उप सभापती झाले. संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ही निवडणूक 'चिठ्ठीवर' निश्चित करण्यात आली होती. चिठ्ठीद्वारे नशीब आजमावण्यात आले. नशिबाने साथ राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. 

भोर नगरपालिका अध्यक्षपदानंतर आता पंचायत समितीचे अध्यक्षपद देखील हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटेंना धक्का बसला. तर आमदार शंकर मांडेकर यांना नशिबाची साथ मिळाली.

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. 

हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ७ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक होते.  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी केवळ एक जागेचा पेच राष्ट्रवादी काँग्रेससमोर होता. अपक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ता येत असल्याचे दिसताच बैठका सुरु होऊन विद्या गायकवाड यांना उपसभापतीपद देण्याचे ठरले.

पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

उदय लेले यांना दुसऱ्यांदा स्वीकृत नगरसेवकपद

माजी महापौर दत्ता धनकवडे सुध्दा सभागृहात 
पुणे: महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार स्पर्धा असून आतापर्यंत सुमारे ८०० हून अधिक अर्ज आयुक्तांकडे प्राप्त झाले आहेत. सत्ताधारी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल ४०० जणा इच्छुक असून त्यापैकी ७ जणांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.


भाजपचे नीलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवि साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड निश्चित होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच राकेश कामठे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड निश्चित केली आहे. यापैकी पालिका निवडणुकीतून डावलण्यात आलेले उदय लेले यांना दुसऱ्यांदा स्वीकृत नगरसेवक पद मिळाले आहे. दत्ता धनकवडे यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता.

 चारशे जणांतून सात नाव निवडण्याचे मोठे आव्हान स्थानिक नेत्यांवर होते, त्यानुसार नावे निश्चित करण्यात आली आणि प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना मंजुरी देऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांना संबंधितांची नावे पाठवली आहेत.

स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याचे अधिकार आयुक्तांना असतात. त्यामुळे अनेक इच्छुकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादर केले आहेत. आतापर्यंत सुमारे ८०० हून अधिक अर्ज आयुक्तांकडे प्राप्त झाल्याने अर्जाची छाननी करण्यासाठी निवडणूक विभागाने चार सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.