Breaking News Latest updates loading...

२९ एप्रिल ते १२ मे दरम्यान राज्यात हाय अलर्ट

  


पुणे: विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उन्हात बाहेर जाऊ नये, कारण हवामान विभागाने सांगितले आहे की तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळावा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी कारण अनेकांना ही माहिती पहिल्यांदाच मिळत असेल, असे आवाहन नागरिक संरक्षण महासंचालनालयाने केले आहे.


 जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवावेत जेणेकरून वायुवीजन होईल. मोबाईलचा वापर कमी करावा, मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस इत्यादी थंड पेयांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिक संरक्षण महासंचालनालयाने नागरिकांना आणि रहिवाशांना पुढील बाबींविषयी इशारा दिला आहे. ४७ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसांत क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण व दमट वातावरण निर्माण होईल. 

पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये. वीजमीटरवर जास्त भार टाकू नये. घरातील वापरात असलेल्या भागातच एसी वापरावा, दोन ते तीन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या. बाहेर तापमान ४५–४७ अंश सेल्सिअस असताना घरातील एसी २४–२५ अंश सेल्सिअस वर ठेवावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहील, असे 

विंचू आणि साप यांच्यापासून सावध रहावे, कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर येऊन थंड जागा शोधण्यासाठी बागेत किंवा घरात येऊ शकतात,अशी सूचना देण्यात आली आहे.

मनोहरमामा भोसले ; दुनिया झुकती है हे सिध्द करणारा बदमाष

आधी डीएडच्या परीक्षेत नापास; नंतर बोंबिल विकले आता म्हणे बाळूमामाचाअवतार 

इंदापूर : स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा तथाकथित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी अटक केली. भोसलेवर याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे ३ गंभीर गुन्हे दाखल होते. अनेक मोठ्या नेत्यांसोबत भोसले याचे फोटो आहेत. 


इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी असलेला भोसले असलेला भोसले डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत असे. एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याच्या थापा मारत करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली.


आधीच्या ३ गुन्ह्यांत जामीनावर असलेला मनोहर पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे. 
कुडूवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह जादुटोणाविरोधी कलमान्वये गुन्ह्याबद्दल फिर्याद दिलेला तक्रारदार गौतम कसबे हा रिअल इस्टेट धारक असून आपल्या व्यवसायामध्ये वारंवार येणाऱ्या अपयशामुळे भोसले याच्या संपर्कात आला. या दरम्यान मनोहर याने पूर्जा-अर्चा केल्यास संकटे दूर होतील आणि व्यवसायात प्रगती असे सांगून २ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ५० हजार रुपये त्याला दिले. परंतु यानंतरही त्याच्या व्यवसायात फारशी सुधारणा झाली नाही. अखेर त्याने कुडूवाडी पोलीस ठाणे गाठून भोसले याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना ताब्यात घेऊन कुडूवाडी पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

अकोला जिल्ह्यात पारा ४६.९ अंश सेल्सिअसवर

 

नागपूर: संपूर्ण विदर्भात उष्णतेने कहर केला असून उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक, ४६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

अमरावती ४६.५ अंश सेल्सिअस ,भंडारा ४४.०अंश सेल्सिअस ,बुलडाणा ४३.५अंश सेल्सिअस अशी परिस्थिती आहे.

ब्रह्मपूर मध्ये ४४.२अंश सेल्सिअस 
चंद्रपूर ४५.० अंश सेल्सिअस ,गडचिरोली ४४.५ अंश सेल्सिअस , गोंदिया ४४.४अंश सेल्सिअस नागपूर ४५.४ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

 यवतमाळ मध्ये ४६ अंश सेल्सिअस तर वाशिम मध्ये ४६.४ तापमान नोंदले गेले. यवतमाळ मध्ये ४६.० अंश सेल्सिअस तापमान होते.

मुंबईत दरमहा २००० हप्ता मागून रिक्षाचालकाकडून १,७०० रुपये स्विकारताना पोलिसाला पकडले

मुंबई: लाचखोर पोलीस शिपाई सतिश गणेश राठोड (क्र. १४१०५३ नेमणूक - घाटकोपर वाहतूक विभाग) याला लाचेची मागणी करुन १,७०० रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आयोजित सापळ्यात पकडण्यात आले.

तक्रारदार रिक्षा चालक असून ते घाटकोपर पश्चिम परिसरात करार करून भाडेतत्वावर रिक्षा चालवतात. ट्रॅफिक ऑफिस गांधी नगर, विक्रोळी पश्चिम येथील लोकसेवक पोलीस शिपाई सतिश राठोड यांनी रिक्षाचा धंदा चालू ठेवण्यासाठी व रिक्षावर चालान दंड न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे आठवडयाचा हफ्ता म्हणून १५०० ते २००० लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना लोकसवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग येथे समक्ष येवून तक्रार दिली.

करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान राठोड याने तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १७०० रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान राठोड यास तक्रारदाराकडून लाचेची रक्कम १७०० स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. 

सतिश राठोड याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

एलपीजीच्या भारतीय पुरवठादार देशांची संख्या वाढून १५

नवी दिल्ली: भारताची दैनंदिन एलपीजीची गरज अंदाजे ८०,००० टन इतकी आहे. दरम्यान, देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असून, सध्या हे उत्पादन ४६,००० टनांच्या पातळीवर पोहोचले आहे. शिवाय, मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला उर्वरित गॅस आता विविध देशांकडून मिळवला जात आहे. यापूर्वी एलपीजीची आयात १० देशांतून केली जात असे, मात्र आता अशा पुरवठादार देशांची संख्या वाढून १५ झाली आहे.

आयातीचा हा विस्तार झाल्यामुळे, परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे; कारण या संघर्षापूर्वी, भारत आपल्या एलपीजीच्या एकूण गरजेपैकी ९० टक्के गॅस विविध आखाती देशांकडून—ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) समावेश होता—मिळवत असे.

संघर्षाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी, भारताची ९० टक्के LPG ची गरज विविध आखाती देशांतून होणाऱ्या आयातीद्वारे पूर्ण केली जात असे; परंतु आता हे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊन ते या नवीन स्रोतांकडे वळले आहे.

 या आखाती देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि ओमान यांचा समावेश होता. तथापि, LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि आयातीचे स्रोत वैविध्यपूर्ण करण्याच्या सरकारच्या 'प्लॅन बी' (Plan B) मुळे, आता बहुतांश खरेदी अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जीरिया आणि रशिया यांसारख्या देशांतून केली जात आहे. अलीकडेच, सरकारने स्पष्ट केले की, एकूण सुमारे ८,००,००० टन LPG च्या मालवाहतूक खेपा (cargo shipments) आधीच निश्चित करण्यात आल्या असून, त्या सध्या वाटेवर आहेत

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बॅंकचा परवाना रद्द केला

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI), २४ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशान्वये, 'बँकिंग नियमन कायदा, १९४९' ('BR कायदा') च्या कलम २२(४) अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बॅंक लिमिटेडला देण्यात आलेला बँकिंग परवाना रद्द केला आहे.

 हा आदेश २४ एप्रिल २०२६ रोजीच्या कामकाजाच्या समाप्तीपासून (business close) अंमलात येईल. परिणामी, पेटीएम पेमेंट्स बॅंकेला 'बँकिंग नियमन कायदा, १९४९' च्या कलम ५(b) मध्ये परिभाषित केल्यानुसार 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास, किंवा कलम ६ अंतर्गत नमूद केलेला कोणताही अतिरिक्त व्यवसाय करण्यास, तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक या बँकेच्या समापनासाठी (winding up) उच्च न्यायालयात अर्ज दाखल करेल. बँकेचे समापन झाल्यास, आपली संपूर्ण ठेव दायित्वे (deposit liability) परत करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बॅंकेकडे पुरेशी तरलता (liquidity) उपलब्ध आहे.

रिझर्व्ह बँकेने Paytm Payments Bank Limited चा परवाना खालील कारणांमुळे रद्द केला:

बँकेचे कामकाज अशा पद्धतीने चालवले जात होते, जे बँकेच्या आणि तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक होते. अशा प्रकारे, बँक BR कायद्याच्या कलम २२(३)(b) चे पालन करत नाही.

 बँकेच्या व्यवस्थापनाचे सर्वसाधारण स्वरूप हे ठेवीदारांच्या हितासाठी, तसेच जनहितासाठी प्रतिकूल आहे. अशा प्रकारे, बँक BR कायद्याच्या कलम २२(३)(c) च्या तरतुदींचे पालन करत नाहीये.

 BR कायद्याच्या कलम २२(३)(e) मध्ये परिकल्पित केल्यानुसार, बँकेला कामकाज चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्यातून कोणताही उपयुक्त उद्देश किंवा जनहित साध्य होणार नाही.

 बँकेला देण्यात आलेल्या 'पेमेंट्स बँक' परवान्यामध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली; ज्यामुळे BR कायद्याच्या कलम २२(३)(g) च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.

वादग्रस्त आमदार संजय गायकवाड विरोधात कोल्हापुरात पोलीस तक्रार

 कोल्हापूर: शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आमदार संजय गायकवाड विरोधात खालील तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुन्हा नोंदवितो, असे सांगितले आहे. गायकवाड एकनाथ शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार आहेत.


प्रशांत श्रीकांत आंबी ( रा. राजेंद्रनगर, नवीन वसाहत, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. फोनवर अश्लील शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, जीभ कापण्याची व घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत संजय गायकवाड या बुलढाणा येथील आमदार विरोधात फौजदारी तक्रार दिली आहे. ॲड. असीम सरोदे हे तक्रारदाराला सहकार्य करत आहेत.


आंबी अनेक वर्षे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक नाममात्र  किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित करण्याचे काम करीत आहेत. या पुस्तकाच्या शीर्षकात “शिवाजी कोण होता?” असा एकेरी उल्लेख का अशा कारणावरून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना धमकी दिली आहे.

संजय गायकवाड यांचे प्रत्येक वाक्य कुणालाही राग येईल, मनाचा  तोल बिघडेल आणि मानासिक परिणाम होईल असे तणाव निर्माण करणारे होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी, असंस्कृतपणा, स्त्री देहाचा अपमान करणारे घाणेरडे उच्चार इतकेच नाही तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी स्टेटमेंट्स आहेत. संजय गायकवाड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत हे याआधीच्या अनेक घटनांवरून दिसते. त्यांनीच अत्यंत गर्वाने सांगितले की, मी कोण आहे ते गुगल, युट्युब इत्यादी समाज माध्यमांवर बघावे, असे तक्रारीत नमूद करुन आंबी यांनी म्हटले आहे की आमदार असणे म्हणजे आपण काहीही बोलू शकतो, कुणालाही धमक्या देऊ शकतो, कुणाच्याही आई-बहिणींची, बायकोची इज्जत काढू शकतो, कुणालाही मारू शकतो असे त्यांना वाटते. 

आंबी यांनी म्हटले आहे की कोणतेही सभ्य संभाषण न करता केवळ शिवीगाळ, असभ्य भाषा असेच संजय गायकवाड करीत होते. तरीही मी त्यांना नम्रपणाने माझे म्हणणे सांगत होतो. दरम्यान मी त्यांना अनेकवेळा तुम्ही पुस्तक वाचा अशी सुद्धा विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार माझ्याकडून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते फक्त शिवीगाळ करीत होते आणि धमक्या देत होते. कोल्हापुरात घरात घुसून तुला मारणार असे त्यांनी अनेकदा म्हटले. ते असंस्कृत, हिंसक लोकांच्या मदतीने माझ्या घरात घुसतील, दंगल घडवून आणतील, सामाजिक तेढ निर्माण करतील अशी साधार भीती मला व माझ्या कुटुंबियांना आहे. त्यांनी व त्यांच्या सोबतच्या गुंडानी आधी सुद्धा अनेकांना जीवावर बेतेल अशी मारहाण केलेली आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड वर गुन्हा नोंदवावा.