पुणे: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मधील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी व मागण्यांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चामध्ये सुमारे ५००० कामगारांचा सहभाग होता.
महाराष्ट्र राज्य लढा कृती समितीचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी आणि कामगार कायदे सल्लागार ॲड. संतोष म्हस्के, वंदना पवार यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नेतृत्व करण्यात आले होते. या कामगारांना कसेल त्याची जमीन या तत्त्वानुसार निवासाची जागा म्हणून दोन गुंठे देण्यात यावी व त्यांच्या थकीत रकमा तात्काळ अदा करण्यात याव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
शेती महामंडळ मधील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मोर्चा
ईदचा चंद्र दृष्टीस पडलेला नाही; ईद शनिवारी
नवी दिल्ली: 'इमारत-ए-शरीयत-ए-हिंद'ने गुरुवारी केलेल्या घोषणेनुसार, ईदच्या सुरुवातीचे संकेत देणारा चंद्र (ईदचा चंद्र) दृष्टीस पडलेला नाही. या संदर्भात, नवी दिल्ली येथील बहादूर शाह जफर मार्गावर 'रुयत-ए-हिलाल समिती'ची बैठक पार पडली; या बैठकीत चंद्र दृष्टीस न पडल्याच्या बाबीला दुजोरा देण्यात आला. समितीने स्पष्ट केले की, चंद्र दृष्टीस न पडल्यामुळे आता 'ईद-उल-फित्र' हा सण शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी साजरा केला जाईल. शिवाय, देशभरातील मुस्लिम बांधवांनी या निश्चित केलेल्या तारखेनुसारच हा सण साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सद्गुरु जंगली महाराज यांच्या १३६ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १ एप्रिल पर्यंत महोत्सव
पुणे: सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३६ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त १९ मार्च ते १ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, प्रसिद्ध गायक, कलाकारांची भक्तीगीते आणि संगीताचे कार्यक्रम तसेच प्रतिदिनी सायंकाळी ६.०० ते ७.१५ पर्यंत विद्वानांची व्याख्याने असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके १९४८, गुरुवार दि. १९ मार्च (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध चतुर्दशी, बुधवार दि. १ एप्रिल २०२६ अखेर, मंदिरात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज पहाटे समाधीला अभ्यंगस्नानानंतर आढाव बंधू यांचे सनईवादन झाले. श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळातर्फे आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण आदी कार्यक्रम झाले.
बुधवार दि. १ एप्रिल रोजी रात्री ९ वा. श्री सद्गुरु जंगली महाराजांच्या यांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक, श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळासह, श्रीरोकडोबा मंदिर शिवाजीनगर गावठाण, येथून निघून समाधी मंदिरात येईल. नंतर महोत्सवाची दुसऱ्या दिवशी महाप्रसादाने सांगता होईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.
पुण्यात अवकाळी पाऊस
पुणे: शहरात गुढीपाडव्याच्या दिवशीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी पाऊण पूर्वी पावसाची मध्यम स्वरूपाची सर कोसळली. त्यामुळे गारवा निर्माण झाला. दोन दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ होत होते. आज पावसाने प्रत्यक्ष हजेरी लावली. उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी सजवलेल्या गुढ्या भिजल्या.
हवामान शास्त्र विभागाने ४ दिवस पावसाचा अंदाज सांगितला होता, तो गुरुवारी खरा ठरला. सुमारे अर्धा तास मध्यम स्वरूपाची सर कोसळली.
पुढील ३ तासांत बीड,लातूर,नांदेड,परभणी, पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींसह ताशी ३०-४० किमी वेगाने सोसाट्याच्या वाऱ्याची दाट शक्यता आहे.
सारे श्रेय ॲड. मिलिंद पवार यांचे
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या जयंतीदिनी मी व किशोर विरोधातील एक तपा पेक्षाही अधिक जुन्या संवेदनशील फौजदारी खटल्याचा निकाल केवळ ॲड. मिलिंद पवार व सहकाऱ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वकिली मांडणीमुळे तसेच बुध्दी चातुर्यामुळे आमच्या बाजूने लागला आहे . ही बाब आमच्या सह सर्वच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना विशेष आनंद व प्रेरणा देणारी आहे. न्यायाधिशांनी आम्हाला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, असे सांगताच माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले, अशी प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले '' आम्ही जवळपास ही केस विसरलो होतो पण ॲड. मिलिंद पवार यांनी सामाजिक जाणिवेतून सर्वच प्रकरण कायदेशीर अभ्यास करून लढवले. महाराष्ट्र व देशभरातील सहकारी अभिनंदन करत आहेत. बरेच वर्षांनंतर आम्हालाही एवढे अभिमानास्पद दिवस आले आहेत. त्याचे शंभर टक्के श्रेय केवळ पवार व सहकाऱ्यांना जाते. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला केवढे मोठे बळ देता येते हे आपल्या कृतीतून सिद्ध झाले.''
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची निर्दोष मुक्तता
ब्राह्मण समाजा विरोधात भडकावू लेखनाचा
आरोप
पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती पी. बी. पाटील यांनी मराठा सेवा संघ,संस्थापक पुरुषोत्तम सूर्यभान खेडेकर (वय- ७७ रा. जिजाऊ प्रकाशन नारायण पेठ) व प्रकाशक किशोर साहेबराव कडू (वय- ४२ रा. पुणे यांची ब्राह्मण समाजाविरोधात भडकावू पुस्तकाचे लेखन केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी "शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे" या शीर्षकाखाली एका पुस्तकाचे लेखन केले होते. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे व विधानसभेचे छायाचित्र छापलेले आहे. पुस्तकात ब्राह्मणी व्यवस्थे विरूध्द लिखाण केले होते.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे या पुस्तकामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दंगली होतील असे वाटल्याने भाजपाचे माजी नगरसेवक शाम सातपुते यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे येथे खेडेकर व कडू यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.
या खटल्याचे काम पहाण्यासाठी सरकारच्या वतीने विशेष व जेष्ठ सरकारी वकिलांची नेमणूक केली होती. ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी श्री. खेडेकर व कडू यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.
जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने पुण्यामध्ये येऊन भांडारकर इन्स्टिट्यूट मधून माहिती घेऊन " शिवाजी; द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या नावाचे पुस्तक लिहून प्रकाशित केले होते. त्या पुस्तकांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांच्या विषयी चुकीची माहिती व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी माहिती पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूट मधील काही लोकांनी जाणीवपूर्वक जेम्स लेन या लेखकाला माहिती पुरवली होती, असे जेम्स लेन यानेच जाहीर केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या विषयी अतिशय घाणेरडे लिखाण जेम्स लेन याने केले व त्याला पुण्यातील ब्राह्मणांनी मदत केली त्या द्वेषातून 'शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे ' या पुस्तकाचे या शीर्षकाखाली त्या रोषातून खेडेकर यांनी ते पुस्तक लिहिले असे पोलीस तपासात खेडेकर यांनी पोलिसांना सांगितले होते.
पुणे येथील न्यायालयामध्ये "शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे" हे पुस्तक खेडेकर यांनीच लिहिले व कडू यांनीच ते प्रकाशित केल्याचे सरकार पक्षाला सिद्ध करण्यास अपयश आले. लिखाणाचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे त्या पुस्तकावरून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण झाली किंवा दंगली झाल्या असे काही घडलेले नाही. फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी फिर्याद व खोटा खटला पुरुषोत्तम खेडेकर व किशोर कडू यांच्या विरोधात दाखल केला.
खटला गंभीर नसताना किंवा कुठलेही संयुक्तिक कारण नसताना फक्त सत्तेचा गैरवापर करून या खटल्यात जाणीवपूर्वक मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विरोधात विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली असल्याचा युक्तिवाद ॲड. मिलिंद पवार, ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार, ॲड. सुयोग गायकवाड, ॲड सारंग बहिरट, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव यांनी केला. वरील युक्तिवाद ग्राह्य धरून सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.



