पानमसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थांविरोधात कारवाई
पुणे: राज्यातील प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, भेसळ अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर २५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत धडक मोहीम राबवली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार केलेल्या सात दिवसांच्या कारवाईत एकूण १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई करत ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.सुमन कल्याणपूर कालवश
मुंबई: ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी ३१ मे २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी आपल्या मखमली आणि सुमधुर आवाजाने मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये अनेक अजरामर गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म
२८ जानेवारी १९३७ रोजी ढाका (सध्या बांगलादेश) येथे झाला. त्यांनी १९५३ मध्ये आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली。 'तुमने पुकारा और हम चले आए', 'ना जाने क्यूँ होता है', आणि 'मुझको अपने गले लगा लो' ही त्यांची अत्यंत लोकप्रिय हिंदी गाणी आहेत.
भारतीय संगीतसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना २०२३ मध्ये केंद्र सरकारकडून 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होत.
लढ्यामुळे सरकार झुकले : मनोज जरांगे पाटील
उपोषण मागे; रुग्णालयात दाखल
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे ज्येष्ठ नेते मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री उशिरा उपोषण मागे घेताना मराठा समाजाला संबोधित केले. ते म्हणाले की या लढ्यामुळे सरकारला झुकून काम करावे लागले आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आम्हीच सरकारला शोधायला लावल्या, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दोन दिवस अन्न-पाणी न घेता भर उन्हात उपोषण केल्यामुळे त्यांची तब्येत कमालीची खालावली आहे. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांना पुढील ४८ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका आता धर्मादाय आयुक्तांकडे
विधी व न्याय विभागाचे राजपत्र प्रसिद्ध
पुणे: महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मध्ये सप्टेंबर २०२५ पासून केलेल्या सुधारणांनुसार नुकत्याच लागू केलेल्या नविन कलम ‘५०ब’ च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ज्या देवस्थानांचे नियमन दिवाणी अथवा जिल्हा न्यायालयाकडे होते ते रद्द करण्याचे राजपत्र २९ मे रोजी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आले आहे. आता या देवस्थानांचे विश्वस्त मंडळामध्ये धर्मादाय आस्थापनेतील सहाय्यक, उपायुक्त तसेच सह आयुक्तांकडे संबंधित दिवाणी अथवा जिल्हा न्यायाधीशांच्या ऐवजी विश्वस्त म्हणून काम करण्याचे अधिकार हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच या देवस्थान ट्रस्टच्या पुढील विश्वस्तांच्या नियुक्त्यादेखील हेच अधिकारी करतील. शासनाच्या वतीने विधी न्याय विभागामार्फत उप विधी सल्लागार तसेच उपसचिव डॉ. कुंवरसिंह सिंघेल यांनी राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे राजपत्र प्रकाशित केले आहे.
या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे नागपूर येथील अदासाच्या श्री गणपती देवस्थान ट्रस्ट साठी वरिष्ठ सह आयुक्त आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या बाबतीत तेथील धर्मादाय उपायुक्त मनोनीत करण्यात आले आहेत. मांढरदेवी ट्रस्ट साठी तसेच क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान साठी सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे कडे नियुक्तीचे अधिकार असतील.
नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त आठ देवस्थानांपैकी त्र्यंबकेश्वर देवस्थान, काळाराम मंदिर ट्रस्ट, वणी येथील सप्तशृंगी देवी ट्रस्ट, व्यंकटेश बालाजी संस्थान यासाठी नाशिकचे वरिष्ठ सह धर्मादाय आयुक्त यांचेकडे अधिकार देण्यात आले आहेत. अगरटाकळी स्थित रामदास स्वामी मठ आणि मारुती मंदिरासाठी धर्मादाय उपायुक्त तर चांदवड येथील केद्राई माता देवस्थान तसेच सटाण्याच्या संकट मोचन मारुती ट्रस्ट साठी नाशिकचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त नियुक्त झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकपैकी रांजणगाव गणपती देवस्थान तसेच आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थान करिता पुण्याचे वरिष्ठ सह धर्मादाय आयुक्त तर कानेरसर येथील यमाई देवी ट्रस्ट साठी धर्मादाय उपायुक्तांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
अहिल्यानगरचे धर्मादाय उपायुक्त यांचेकडे मोहटा देवी संस्थानची जबाबदारी असेल तर माहूरच्या रेणुकादेवी संस्थानसाठी नांदेडचे सह धर्मादाय आयुक्त यांना अधिकार दिले आहेत. चंदगडच्या देव रवळनाथ ट्रस्ट साठी कोल्हापूरचे सह धर्मादाय आयुक्त तर देवुळगाव राजा येथील बालाजी महाराज संस्थानसाठी बुलढाणा येथील वरिष्ठ सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधिशांचे अधिकार संपुष्टात
ही सर्व देवस्थाने पुरातन असून राज्याचा धर्मादाय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांच्या नियमनासाठी तत्कालीन न्यायालयांनी दिवाणी तथा जिल्हा न्यायाधिशांची नियुक्ती केलेल्या योजनेनुसार (scheme) अशा पदसिद्ध नेमणुका असायच्या. विधिमंडळाने दुरुस्ती विधेयक मंजूर केल्याने आणि तसा स्वतंत्र अध्यादेश निर्गमित केल्याने एक मे पासून दिवाणी तथा जिल्हा न्यायाधिशांचे अधिकार संपुष्टात आले आहेत,अशी माहिती
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज प्र. कदम जहागिरदार यांनी सांगितली.
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे, समाजातील आक्रोश इतका वाढला आहे की मराठा बांधवांनी 'समृद्धी महामार्ग' रोखून धरला आहे.
रस्त्यावर उतरलेला हा जनसागर आणि जरांगे पाटलांचे उपोषण ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी, सरकारने कोणतीही चालढकल न करता मराठा समाजाच्या कायदेशीर आणि न्याय्य मागण्या त्वरित मंजूर करायला हव्यात. समाजाचा संयम आता संपत चालला आहे!
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून नये यासाठी काल आमदार प्रसाद लाड, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली यावेळी चर्चेदरम्यान..
अधिकारी ऐकत नाहीत, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतो, हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीत आमच्याकडून विलंब झाला
, सातारा गॅझेटिअर्सचा जीआर काढला तर कोर्टात चॅलेंज होऊ शकतो म्हणून जीआर काढला नाही, असे मुद्दे मराठा उपसमितीचे उपाध्यक्ष विखे पाटील यांनी मांडले. यावरून निर्णय घेण्यास विखे पाटील असमर्थ असल्याचे दिसले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. आजपासून ते आंतरवाली येथे भर उन्हात उपोषण करणार आहेत.
पुण्यात अवैध दारूविरोधात १००० छापे
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
पुणे: अवैध दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की प्राथमिक दृष्ट्या, मृत व्यक्तींना दारूच्या नशेत असल्याचा इतिहास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शवविच्छेदन करण्यात आले असून, अवयवांचे नमुने आरएफएसएलकडे (RFSL) पाठवण्यात आले आहेत. आज रात्रीपर्यंत अहवाल मिळण्याची अपेक्षा आहे. तपासातील निष्कर्षांच्या आधारे, आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये जो कोणी सामील असेल त्याला शिक्षा होईल, कठोर कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले ''आम्ही यावर्षी २७ मे पर्यंत पुणे शहर हद्दीत अवैध दारूविरोधात १००० छापे टाकले आहेत. आम्ही आमचा शोध आणखी तीव्र करत आहोत. आतापर्यंत एकूण ४ मृत्यूंची नोंद झाली आहे. जिथेपर्यंत आरोपींचा संबंध आहे, कदाचित ते सर्वच यात सामील आहेत.''
दरम्यान, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू हा विषारी गावठी दारूमुळे झाल्याचे समजते. गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे.
दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांड प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
पुणे पोलीस उपायुक्तांनी या मृत्यूकांडाच्या माहितीला दुजोरा दिला. दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११ आहे. यात पिंपरीतील ६ आणि हडपसरच्या ५ जणांचा समावेश आहे. बाकी इतर मृत्यू हे वेगवेगळ्या कारणाने झाले आहेत. यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तसेच या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला , अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली.
अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवले होते. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे
तर याच विषारी दारूमुळे हडपसर मधील ५ जण दगावले. त्यांच्यापैकी अनेक लोकांना गावठी दारू प्यायल्यावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता.
राहुल शरद क्षीरसागर (४५)
विजय भूकुरलाल शर्मा (४५) अरुण डाडर ( सर्व राहणार हडपसर)
अशोक रमेश चव्हाण ( रा. काळेपडळ)
पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे ( फुगेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटल आणि अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याची ब्राह्मण संघटनांची मागणी
पुणे: गुरुवर्य दादोजी कोंडदेव आणि नाटककार राम गणेश गडकरी
यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था / संघटना या सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या सदस्य आहेत.
यावेळी भालचंद्र कुलकर्णी, विश्वजित देशपांडे, संदीप खर्डेकर, मंदार रेडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकिकर, मनोज तारे, तृप्ती तारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
काही समाजकंटकांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यांमुळे तसेच सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला आहे. श्रेष्ठ लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी आमची मागणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे,असे निवेदनात म्हटले आहे.
पुणे शहरातील सर्वच समाजातील महापुरुषांच्या जयंती / पुण्यातिथीनिमित्ताने संबंधित पुतळ्यांबाबत पुणे महापालिका सन्मानाने यथोचित कार्यक्रम करीत असते, अशा वेळी वरील नमूद दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची सुयोग्य ठिकाणी पुनर्स्थापना करावी व सन्मान राखला जावा, अशी आमची आग्रहाची मागणी व विनंती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
भालचंद्र कुलकर्णी, ईशानी जोशी, विश्वजीत देशपांडे , संदीप खर्डेकर हे सकल ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी असून सूर्यकांत पाठक, मंदार रेडे, चैतन्य जोशी, सुनिल पारखी, समीर गाडगीळ, विश्वनाथ भालेराव, अतुल व्यास, सौ. पद्मा जोशी, श्रीकांत जोशी, राजेंद्र कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, अमित शहाणे, मनोज तारे, विजय शेकदार, मनोज पांचारिया, अजय दाते, रमेश भागवत, मयुरेश अरगडे, शामराव कुलकर्णी, विश्राम कुलकर्णी, मोहन मुंगळे, ह्रषिकेश सुमंत, सचिन वाडे-पाटील, गिरीश शेवडे, स्मिता इंदापूरकर, उदय लेले, सुजाता मवाळ, मकरंद माणकीकर, सागर मांडके, कुंदनकुमार साठे सदस्य आहेत.
फुगेवाडीत एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यू
विषारी गावठी दारूमुळे हडपसर मध्येही बळी
पुणे : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी ८ जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू हा विषारी गावठी दारूमुळे झाल्याचे समजते.
गेल्या दोन दिवसात पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला आहे, तर चार जणांचा मृत्यू इतर कारणाने झाला आहे.
दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने तोंडातून फेस आला, कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दारूकांड प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
पुणे पोलीस उपायुक्तांनी या मृत्यूकांडाच्या माहितीला दुजोरा दिला. दारू पिऊन मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११ आहे. यात पिंपरीतील ६ आणि हडपसरच्या ५ जणांचा समावेश आहे. बाकी इतर मृत्यू हे वेगवेगळ्या कारणाने झाले आहेत. यात नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
तसेच या मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली. तो स्वतः पोलिसांसमोर हजर झाला , अखेर त्याला अटक करून चौकशी सुरू करण्यात आली.
अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानेच पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पुण्याच्या हडपसर भागात केमिकलयुक्त स्पिरिट पोहोचवले होते. या स्पिरिटपासून बनवलेली घातक हातभट्टीची दारू प्यायल्याने पिंपरीत ६ जणांना जीव गमवावा लागला आहे
तर याच विषारी दारूमुळे हडपसर मधील ५ जण दगावले. त्यांच्यापैकी अनेक लोकांना गावठी दारू प्यायल्यावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता.
राहुल शरद क्षीरसागर (४५)
विजय भूकुरलाल शर्मा (४५) अरुण डाडर ( सर्व राहणार हडपसर)
अशोक रमेश चव्हाण ( रा. काळेपडळ)
पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे ( फुगेवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटल आणि अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
फ्लोरिडात रॉकेटचा प्रचंड स्फोट
वाॅशिंग्टन : फ्लोरिडाच्या लॉन्च कॉम्प्लेक्स ३६ येथे एका स्थिर अग्नि चाचणीदरम्यान न्यू ग्लेन रॉकेटचा स्फोट झाला. या प्रचंड स्फोटामुळे बूस्टर पूर्णपणे नष्ट झाला आणि लॉन्चपॅडचेही नुकसान झाले, परंतु सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे भोपाळ येथे निधन
भोपाळ: प्रख्यात कवी आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचे गुरुवारी दुपारी भोपाळ येथे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी, बशीर बद्र यांना बऱ्याच काळापासून स्मृतिभ्रंशाचा त्रास होता आणि त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांनी आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य आणि काव्यविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
बऱ्याच काळापासून ते स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते आणि त्यांच्या साध्या, हृदयस्पर्शी गझलांसाठी साहित्यविश्वात ते सदैव स्मरणात राहतील. साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री (१९९९) आणि साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या गझलांची शैली साधी आणि सहज होती, जी थेट हृदयाला भिडणारी होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने देश-विदेशातील साहित्यप्रेमी आणि चाहत्यांमध्ये धक्का बसला आहे.
त्याच्या काही सर्वात लोकप्रिय आणि अजरामर ओळी खालीलप्रमाणे आहेत:
ख़ुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे..
अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना
हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है..
अगर तलाश करूँ कोई मिल ही जाएगा
मगर तुम्हारी तरह कौन मुझ को चाहेगा..
कभी कभी तो छलक पड़ती हैं यूँही आँखें
उदास होने का कोई सबब नहीं होता..
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में.. ..
ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है ज़मीं
पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है..
देशात एकूण मृत्यूंपैकी ३२.१ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे
ताण, धूम्रपान, मद्यपान, जंक फूड, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे
नवी दिल्ली: भारतात बदलती जीवनशैली, ताणतणाव, अयोग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे आता एक गंभीर आरोग्य संकट बनत आहे. जनगणना महालेखापरीक्षकांच्या 'भारतातील मृत्यूची कारणे २०२२-२४' या अहवालानुसार, देशात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण असून, हे प्रमाण ३२.१ टक्के आहे. याचा अर्थ, दर तीन मृत्यूंपैकी एक मृत्यू हृदयविकारामुळे होतो.
या अहवालात असेही दिसून आले आहे की, उत्तर भारतातील परिस्थिती सर्वात चिंताजनक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर वेळेवर प्रतिबंध आणि जनजागृतीचे प्रयत्न केले नाहीत, तर येत्या काही वर्षांत हे संकट अधिकच गंभीर होईल.
जनगणना महालेखापरीक्षकांच्या अहवालानुसार, भारतात हृदयरोग हे सर्वाधिक मृत्यूंचे कारण असून, हे प्रमाण ३२.१ टक्के आहे. उत्तर भारतात परिस्थिती सर्वात गंभीर आहे. या अहवालात श्वसनसंस्थेचे आजार, मधुमेह, पचनसंस्थेचे आजार आणि क्षयरोग यांनाही मृत्यूची प्रमुख कारणे म्हणून सूचीबद्ध केले आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, चुकीची जीवनशैली आणि तणावामुळे येत्या काही वर्षांत हे आरोग्य संकट अधिक गंभीर होऊ शकते.
हृदयविकाराचे रुग्ण का वाढत आहेत?
अहवालानुसार, देशात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. उत्तर भारतात हृदयविकारामुळे होणारा मृत्यूदर ३५.१ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मध्य भारतात तो २४.१ टक्के आहे. डॉक्टरांच्या मते, सततचा ताण, धूम्रपान, मद्यपान, जंक फूड, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. अगदी तरुण वयातही लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह झपाट्याने वाढत असून, त्याचा थेट परिणाम हृदयावर होत आहे.
कोणत्या आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत?
अहवालात असेही म्हटले आहे की, हृदयरोगानंतर इतर अनेक गंभीर आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. श्वसनसंस्थेच्या आजारांमुळे ६ टक्के, पचनसंस्थेच्या आजारांमुळे ५.९ टक्के आणि श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे ५.७ टक्के मृत्यू होत आहेत. मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या ४.८ टक्के दक्षिण भारतात नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर, अज्ञात ताप, दुखापत आणि जननमूत्रसंस्थेचे आजार हीदेखील मृत्यूची प्रमुख कारणे बनत आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, क्षयरोग हा देखील एक गंभीर धोका असून, त्यामुळे एकूण मृत्यूंपैकी २.६ टक्के मृत्यू होत आहेत.
देशात आजार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे
मृत्यूची टक्केवारी
हृदयरोग :३२.१ टक्के
श्वसन रोग :६ टक्के
पाचक प्रणाली रोग : ५.९
श्वसन संक्रमण ५.७
मधुमेह ३.६
दुखापत ४.१
क्षयरोग २.६
पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक होता का?
या अहवालातून पुरुष आणि महिलांवर होणाऱ्या आजाराच्या परिणामातील फरकही उघड झाला आहे. पुरुषांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांमुळे ७.७ टक्के मृत्यू झाले, तर महिलांमध्ये हा आकडा ३.४ टक्के होता. पुरुषांमधील ३.८ टक्के आणि महिलांमधील २.९ टक्के मृत्यू जननमूत्रमार्गाच्या आजारांमुळे झाले. तज्ञांच्या मते, पुरुषांमधील धूम्रपान, मद्यपान आणि उच्च पातळीचा ताण अनेक आजारांचा धोका वाढवतात. महिलांमधील आरोग्य तपासणीकडे होणारे दुर्लक्ष हीदेखील चिंतेची बाब आहे.
सुधारलेल्या आरोग्य सेवांमुळे चित्र बदलले आहे का?
अहवालात असेही म्हटले आहे की, तरुण वयातील मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे आणि लोक पूर्वीपेक्षा जास्त काळ जगत आहेत. याचे श्रेय सुधारित उपचार, लसीकरण आणि विस्तारित आरोग्य सेवा यांना दिले जाते. तथापि, वृद्धांमधील मृत्यूंची संख्या वाढली आहे. ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अज्ञात कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, सुधारित आरोग्य सुविधा असूनही, जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. उत्तम आरोग्य सुविधा असूनही, जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत, जे भविष्यासाठी एक मोठा धोका बनू शकतात.
काय सूचना केल्या आहेत?
हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. लोकांनी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव कमी करणे यांसारख्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. लहान मुले आणि तरुणांमधील मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य कार्यक्रम अधिक मजबूत करण्याची शिफारसदेखील या अहवालात करण्यात आली आहे. जनजागृती आणि प्रतिबंधावर भर दिल्यास मोठ्या संख्येने जीव वाचवता येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
खासगी वस्त्या झोपडपट्टी सदृश्य दाखवून एसआरए योजनेतून टीडीआरची फॅक्टरी
'आपले पुणे आपला परिसर' ची पालिका आयुक्तांकडे तक्रार
पुणे: खाजगी मालकीचे वाडे, घोषित नसणाऱ्या खाजगी मालकीच्या वस्त्यांना झोपडपट्टी सदृश्य दाखवून एसआरए योजना मान्य करण्यात येतात. त्यामुळे महानगरपालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. मनपाचे उत्पन्न बुडत आहे आणि टीडीआरची फॅक्टरी चालू आहे या दोन्ही त्रासातून मुक्तता करायची असेल तर आपणास हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही अशी तक्रार 'आपले पुणे
आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेने
पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केली.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे अनिर्बंध सत्तेचे ठिकाण नाही. पुण्यातील सर्व पेठांच्या मध्ये बिनधास्तपणे झोपडपट्टी दाखवून काम करण्याचा मोठा प्रयत्न ठराविक विकसक आणि अधिकारी मिळून करत आहेत.
आपण तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली.
माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी माजी नगरसेवक प्रशांत बधे या संस्थेचे पदाधिकारी आहेत.
केसकर यांनी सांगितले की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे शहरातील ज्या ठिकाणी खाजगी मालकीचे वाडे-वस्त्या आहेत ती जागा झोपडपट्टी सदृश्य आहे असे दाखवून महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात ज्या ठिकाणी आरक्षण आहेत अशा सर्व ठिकाणी झोपडपट्टी सदृश्य अशी कायद्यातील पळवाट काढून आपल्या उपायुक्तांचा अहवाल घेऊन योजना मंजूर करीत आहे, ही गंभीर बाब आहे.
दहा हजार चौरस फुटाचा एक प्लॉट जर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जाहीर केला तर महानगरपालिकेचे किमान साडेचार कोटी रुपयांचे (बांधकाम शुल्क) नुकसान होते.
पुण्यातील अशा असंख्य वाड्यांना बिल्डिंगना सध्या परवानगी देण्याचा धडाका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सुरू केला आहे.
यापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्याला लेखी स्थगिती दिली होती तरी देखील जोरदारपणे झोपडपट्टी सदृश्य योजनांना परवानगी देण्याचे काम मनापासून सुरू आहे, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.
घोषित नसलेली कुठलीही जागा जर झोपडपट्टी म्हणून जाहीर करणार असतील तर त्यावर पुणे महानगरपालिकेने हरकत घेतली पाहिजे आपण आपल्या उपायुक्तांंना एनओसी देण्यापूर्वी आयुक्तांची लेखी परवानगी घ्यावी असे आदेश द्यावेत. मनपाचे उत्पन्न बुडत आहे आणि टीडीआरची फॅक्टरी चालू आहे या दोन्ही त्रासातून मुक्तता करायचे असेल तर आपणास हस्तक्षेप करण्याशिवाय पर्याय नाही. आपण तातडीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त यांनी दिलेले अहवाल मागवून त्याची शहानिशा करेपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
'दीनानाथ'च्या कल्वर्ट बाबत "प्रायमूव्ह" कडून पारदर्शक सर्वेक्षण करून अहवाल खुला करणार
संदीप खर्डेकर यांची माहिती
पुणे: नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा आणि नालेसफाईचे काम वेगाने पूर्ण करा अशा सूचना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. या वर्षी जर नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटी मध्ये शिरले तर मी स्वतः जनआंदोलन उभारेन व कामचुकार पणा करणाऱ्यांवर कारवाई साठी आग्रही राहीन असेही त्या म्हणाल्या.
म्हात्रे पुल ते राजाराम पुल या डीपी रस्त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्त्याचे व तेथील नाल्यावर कल्वर्ट ( छोटा पुल ) बांधण्याचे काम सुरू आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आज कामाची पाहणी करण्यात आली त्यावेळी दीनानाथ रुग्णालय व मनपा प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्या.
दीनानाथ रुग्णालयातर्फे बांधण्यात येत असलेल्या कल्वर्ट मुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन त्याचा फुगवटा होऊन अरुंद नाल्यातील पाणी पावसाळ्यात नाल्यालगतच्या सोसायटीत शिरण्याची शक्यता आहे. याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी 'प्रायमूव्ह' चे अजित ओक यांना संपर्क केला व त्यांनी याबाबत त्वरित पाहणी करून वास्तुनिष्ठ अहवाल देण्याचे मान्य केले. याच ठिकाणी नाल्यातील सिमेंट ब्लॉक व अन्य डबर त्वरित काढावे अशी सूचना संदीप खर्डेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला केली. ते आम्ही तातडीने करून घेऊ असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. योगेश भोपे, अभियंता अमोल साने, वारजे कर्वेनगरच्या सहाय्य्क आयुक्त अस्मिता तांबे,उपअभियंता विनायक शिंदे,कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे, नालेसफाई चे शुभम असवले, कनिष्ठ अभियंता रोहन दिवटे,भाजपा च्या प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुयश गोडबोले, वैभव जमदाडे,मंडल उपाध्यक्ष अनघा जगताप, निलेश घोडके,दिनेश जगताप,शेखर वीर,रुपालीताई मगर यांच्यासह वकीलनगर, सुशीलानगरी,हिमाली, संकुल, संजीवनी व इतर सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक पुनीत जोशी व नगरसेवक सुनील पांडे यांनी नालेसफाईसह नाल्यातून सुरू असलेल्या मलवाहिनीच्या कामाची झाडाझडती घेतली व सर्व प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुढील आठवड्यात मलवाहिनी टाकण्याच्या कामाची विस्तृत माहिती सादर करण्याबाबत व प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याबाबत सूचना केल्या.
विकास लवांडे यांना अखेर जामीन मंजूर
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांना पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलीशा बागल यांनी मंगळवारी जामीन मंजूर केला.
सदर आदेशामुळे बेकायदेशीर अटक, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन आणि नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासंदर्भात महत्त्वाचा संदेश गेला असल्याची चर्चा न्यायवर्तुळात सुरू आहे.
वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ जवळून, विकास लवांडे यांना अटक केली होती. सदर कारवाई ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांचे उल्लंघन करणारी, कायद्याच्या प्रक्रियेविरुद्ध व बेकायदेशीर असल्याचा ठोस युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
जिल्हा न्यायालयात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करून विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द करून घेण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. बचाव पक्षाचे ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा तसेच अटकेसंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचा सविस्तर आधार देत प्रभावी बाजू मांडली.
सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने विकास लवांडे यांना रुपये ३० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
तसेच, भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही तसेच कायमस्वरूपी वास्तव्यासंदर्भातील पत्ता न्यायालयात सादर करावा, या दोन अटींवर जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात ॲड. सुयोग गायकवाड, ॲड. हर्षवर्धन पवार आणि ॲड. सारंग बहिरट यांनीही महत्त्वपूर्ण काम पाहिले.
बेरोजगार तरुण म्हणजे झुरळेच, त्यांनी आत्महत्या केली तरी कुणालाही काही फरक पडत नाही
पुणे: ज्ञानेश्वर उगले नावाच्या तरुणाने डिसेंबर २०२४ मध्ये आत्महत्या केली. पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावण्याचा निमित्ताने मंगेश खामकर याने त्याला आठ लाख रुपयांना फसवले. तब्बल दीड वर्षानंतर म्हणजे मागील आठवड्यात पोलीस तपासासाठी पुणे महापालिकेत येऊन गेले, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुढे आणली आहे.
कुंभार यांनी म्हटले आहे की मी मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नोकरी लावण्याच्या नावाखाली फसवणूक झालेल्या तरुणांचा विषय उचलला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि दोन्ही महापालिकांच्या आयुक्त यांच्याकडे गुन्हेगारांच्या नावानिशी तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप तरी काही ठोस पावले कोणी उचलल्याचे ऐकिवात नाही. कागदी घोडे नाचवण्यावरच सगळ्यांनी समाधान मानले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून फसवणूक करण्यात आली त्यांनीही आपल्या खोट्या सह्या असल्याबद्दल कोणतेही पाऊल उचललेले नाही.
या प्रकरणाबाबतची एकूण शांतता आणि उदासीनतापाहता पालिकेचे काही अधिकारीसुद्धा अशा प्रकारात सामील असावेत अशी शंका घ्यायला जागा आहे. म्हणूनच कदाचित कारवाई करायला विलंब केला जात असेल किंवा टाळले जात असेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला असून मुख्यमंत्री कार्यालयाला याबाबत निवेदन दिले आहे.
वाहतुकीच्या कोंडीची समस्येत हाॅटेलवाल्यांच्या व्हॅलेट पार्किंगची भर
पालिका आयुक्तांकडे तक्रार
पुणे: शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यात व्हॅलेट पार्किंगची (Valet Parking) भर पडली असून हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये तुमची गाडी पार्क करण्यासाठी असणारा नियुक्त सेवक ग्राहकांच्या गाड्या सार्वजनिक रस्त्यांवर पार्क करतो. हॉटेल व्यवसायिक अरुंद गल्ल्यात व्हॅलेट पार्किंग उपलब्धच्या नावाखाली गाड्या लावतात व त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सार्वजनिक रस्त्यांवरील व्हॅलेट पार्किंग बाबत तसेच साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेसेस मधील अनधिकृत वापराबाबत
पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे.
मनपाचे कचखाऊ धोरण आणि अनधिकृत व्यवसायावर कठोर कारवाईसाठीची अनास्था हे मुख्य कारण असल्याचे दिसून येते.
शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता सर्वत्र साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन व पार्किंगच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले असून येथे अनधिकृतपणे व्यवसाय केला जातो. नागरिकांनी आवाज उठविल्यावर मनपा तोंड देखली कारवाई करते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद असतानाही प्रशासन हे करत नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. उदाहरणार्थ गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर ( फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ) तर व्यवसायिक इमारती अथवा प्रसिद्ध रेस्टॉरंट मधील पार्किंगची जागा दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्थिती आहे. या रस्त्यावर वारंवार कारवाई होऊन सुद्धा ही परिस्थिती जैसे थे आहे,असे निवेदनात नमूद केले आहे.
खर्डेकर यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी कोथरूडच्या करिष्मा सोसायटी परिसरासह एरंडवण्यातील अनेक भागात नागरिक वाहतूक पोलिसांसह भेट दिली असता ही बाब प्रकर्षाने जाणवली. विशेषत:
यावर त्वरित कारवाई व कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास शहराची वाहतुकीची स्थिती अधिकच गंभीर होत जाईल हे स्पष्ट दिसते आहे.
विकास लवांडे यांच्या जामीन अर्जावर उद्या आदेश अपेक्षित
सुनावणीदरम्यान वाघोली पोलिसांनी न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडले. तसेच सरकार पक्षाचा युक्तिवादही न्यायालयात सादर करण्यात आला.
विकास लवांडे यांच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात बाजू मांडत सविस्तर युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आदेशासाठी उद्याची तारीख निश्चित केली आहे.
त्यामुळे आता विकास लवांडे यांच्या जामीन अर्जावर न्यायालय उद्या आदेश पारित करणार आहे.
गाय के सन्मान में, मुसलमान मैदान मे
मुस्लिमांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन
पुणे: गाईला "राष्ट्रीय प्राणी" चा दर्जा दिला गेला पाहिजे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहरातील मुस्लिम सामाजिक संघटना, आजी-माजी नगरसेवक, मुस्लिम धर्मगुरू यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना गाईला 'राष्ट्रीय प्राणी' घोषित करून देशातील मॉब लिंचिंग, द्वेषाचे राजकारण थांबवणे आणि सामाजिक सलोखा टिकवण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की गाईला 'राष्ट्रीय प्राणी' चा दर्जा मिळावा यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घेऊन गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा, जेणेकरून तिच्या संरक्षणाची जबाबदारी कायदेशीररीत्या शासनाची असेल.
गुंडगिरी व हिंसेला आळा बसावा: गाईच्या नावावर कायदा हातात घेऊन निष्पाप माणसांना मारहाण करणाऱ्या आणि हत्या करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
धर्माच्या नावावरील राजकारण थांबवावे. गो-रक्षणाच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करून एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्याचे कारस्थान थांबवले जावे. गाईला "राष्ट्रीय प्राणी" घोषित केल्यास या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि शांततापूर्ण तोडगा निघू शकेल. यामुळे ना कोण्या निष्पाप माणसाचा जीव जाईल, ना गाईचा अवमान होईल आणि धर्माच्या नावावर होणारे घाणेरडे राजकारणही कायमचे बंद होईल.
पुण्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने अभिनव बैलगाडी आंदोलन
सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आवाहन
पुणे : पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात महागाई व बेरोजगारीच्या विरोधात सोमवारी पुण्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने अभिनव बैलगाडी आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयापासून ते पुणे महानगरपालिका इमारतीपर्यंत हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी "पेट्रोलचे भाव कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ", "डिझेलचे भाव कधी कमी होणार? मेलोडी खावो, खुद जान जाओ", "गॅसचे भाव कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ", "महागाई कधी कमी होणार ? मेलोडी खावो, खुद जान जाओ" अशा घोषणांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोदींनी संपूर्ण देशाला तयार करण्याचे मेलडी चॉकलेट दिले आहे. त्यागाचा सर्व बोजा सर्वसामान्य जनतेवर सोपवून केवळ एक दिवसाच्या साधेपणाचा आव सत्ताधाऱ्यांनी रील द्वारे आणलेला दिसला. केवळ एक दिवस बुलेट अथवा टू व्हीलर वर फिरून आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा आहे तसा आपला लवाजमा, वाहनांचा ताफा, बडेजाव करत फिरणाऱ्या देवेंद्र फडणवीस व सत्ताधाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांच्या आव्हानातील गांभीर्य काढून घेतले. दोन दिवसांची चमकोगिरी आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती दिसत आहे ! 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीला सामान्य जनता उबली आहे, असे आंदोलकांचे म्हणणे होते.
सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने स्वतः पासून सुरुवात करावी अशी मागणी करत ७ "प्रति- आवाहन" देण्यात आले.
१. शासकीय उत्सवांवरील, उद्घाटने व भूमिपूजन सोहळ्यांवरील उधळपट्टी थांबवा: पुढील १ वर्ष कोणतेही अनावश्यक व भव्य शासकीय सोहळे, उद्घाटन कार्यक्रम, भूमिपूजन कार्यक्रम साजरे करणे बंद करा. ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करा.
२. साधेपणाचा अवलंब: सर्व शासकीय कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात पार पाडावेत. महापौर, नगरसेवक, वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनांच्या सजावटीवर होणारा खर्च तात्काळ थांबवा.
३. वेतन आणि पेन्शनचा त्याग: प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजपच्या सर्व महापौर, नगरसेवक यांनी स्वेच्छेने १ वर्षासाठी आपले वेतन आणि भत्ते (Perks) सोडून द्यावेत.
४. भव्य रॅलींवर बंदी: शक्ती प्रदर्शनासाठी आणि भव्य रॅलींसाठी होणारा अवाढव्य खर्च थांबवून तो पैसा लोककल्याणासाठी वापरावा.
५. विदेशी दौरे रद्द करा: जोपर्यंत अत्यंत आवश्यक नसेल, तोपर्यंत सरकारी खर्चाने होणारे विदेशी अभ्यास दौरे आणि मोठमोठी शिष्टमंडळे पाठवणे बंद करावे.
६. VIP संस्कृतीचा अंत, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदी थांबवा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर: पुढील १ वर्ष सर्व व्ही.आय.पी. कॉन्व्हॉय (ताफा) आणि लक्झरी सरकारी गाड्यांचा वापर थांबवावा. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा 'कार पूलिंग'चा वापर करावा. तसेच १ वर्ष कोणत्याही नवीन सरकारी गाड्यांची खरेदी करू नये. सरकारी आस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा याचे काटेकोर पालन करावे.
७. भ्रष्टाचारमुक्त वर्ष: किमान १ वर्ष तरी प्रशासनातून भ्रष्टाचार पूर्णपणे हद्दपार करण्याची शपथ घेऊन ती पाळावी आणि सर्वसामान्य त्रस्त नागरिकांना प्रशासकीय सेवा तात्काळ देऊन दिलासा द्यावा. भ्रष्ट अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची कारवाई करावी.
यावेळी विजय कुंभार (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ अभिजीत मोरे (प्रदेश सचिव), अमित म्हस्के (प्रदेश समन्वयक), मुकुंद किर्दत (प्रदेश प्रवक्ते), रविराज काळे (प्रदेश युवा अध्यक्ष), संजय कोने (प्रदेश संघटक - कामगार आघाडी), सुदर्शन जगदाळे ( पुणे शहर अध्यक्ष), धनंजय बेनकर (पुणे शहर अध्यक्ष), सुभाष कारंडे (पुणे शहर महासचिव), सतीश यादव (पुणे शहर सचिव), ऋषिकेश कनवटे (प्रदेश युवा आघाडीडी उपाध्यक्ष), एडवोकेट गणेश थरकुडे, विकी पासोटे, शुभम चव्हाण, ऋषिकेश मारणे व इतर उपस्थित होते.
आंबेनळी घाट दरीत कार कोसळून आठ जणांचा मृत्यू
दरीचा परिसर अत्यंत दुर्गम असल्यामुळे मदतकार्यात अडथळे
रायगड : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एका दरीत एसयूव्ही (SUV) कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात एका दरीत 'स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल' (SUV) कोसळल्यामुळे आठ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. ही घटना रविवारी पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाट परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेतील मृत हे साताऱ्याचे रहिवासी होते. हे सर्वजण दापोलीहून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत असतानाच, त्यांची गाडी दरीत कोसळली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर घाटात ही भीषण दुर्घटना घडली आहे. आंबेनळी घाटात एक कार खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील अजगाव येथील आठ तरुण दापोलीच्या सहलीचा आनंद घेऊन आपल्या गावी परतत असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील दाभिल गावाच्या हद्दीत येणाऱ्या वळणावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
वृत्तांनुसार, घटनास्थळी पोलादपूर पोलीस प्रशासन आणि स्थानिक पथके दाखल झाली असून, सध्या मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे. १,००० फूट खोल दरीत कोसळलेल्या व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी ७:०० वाजेपर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. अपघातस्थळी बचाव पथकांसह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.
हा अपघात नेमका कसा घडला?
आंबेनळी घाटातील एका तीव्र वळणावर (हेअरपिन बेंड) ही कार थेट खोल दरीत कोसळली. त्राटसे आणि खर्ड यांच्या दरम्यान वसलेल्या दुर्गम 'तुरगम' भागात, रात्री उशिराच्या सुमारास ही घटना घडली
आंबेनळी घाटातील एका तीव्र वळणावर, एक कार थेट खोल दरीत कोसळली. हा अपघात रात्री उशिरा घडल्यामुळे आणि दरीचा परिसर अत्यंत दुर्गम असल्यामुळे, प्रशासनाला या घटनेची माहिती मिळण्यास थोडा विलंब झाला. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, बचाव पथकाने रात्रभर आपले प्रयत्न सुरूच ठेवले; त्यांनी दोरांच्या साहाय्याने वाहनापर्यंत पोहोचून, आत कोणी प्रवासी अडकले आहेत का, याचा शोध घेतला. तथापि, रात्रीचा अंधार, दरीची प्रचंड खोली आणि तेथील आव्हानात्मक भौगोलिक परिस्थिती यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले आहेत. काही वर्षांपूर्वी, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळली होती; त्या दुर्घटनेत सुमारे ३० जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या ताज्या अपघातामुळे, त्या जुन्या शोकांतिकेच्या थरारक आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत.











